जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथील बैसारण खोऱ्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देशाला हादरून सोडले आहे. या हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले.
या घटनेनंतर आता केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने सर्व माध्यमांना एक महत्त्वपूर्ण सूचना जारी केली. या सूचनेत संरक्षण ऑपरेशन्स आणि सुरक्षा दलांच्या हालचालींचे थेट प्रक्षेपण टाळण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, जेणेकरून राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होणार नाही. ही अॅडव्हायझरी भारत-पाकिस्तानमधील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आणि दहशतवादी हल्ल्याच्या गंभीर स्वरूपामुळे जारी करण्यात आली आहे.
मंत्रालयाने म्हटले आहे की, 'राष्ट्रीय सुरक्षेच्या हितासाठी, भारतीय सैन्याच्या संरक्षण मोहिमा आणि सुरक्षा दलांच्या कारवायांचे थेट प्रक्षेपण करू नका.' काश्मीरमधील पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने 26 एप्रिल 2025 रोजी जारी केलेल्या निवेदनात नमूद केले की, सध्याची परिस्थिती लक्षात घेता, राष्ट्रीय हितासाठी मीडिया चॅनेल्सनी लाईव्ह कव्हरेज करताना सावधगिरी बाळगावी. सूचनेत खालील प्रमुख मुद्द्यांचा समावेश आहे
थेट प्रक्षेपणावर बंदी: सर्व माध्यमांना संरक्षण ऑपरेशन्स, सुरक्षा दलांच्या हालचाली, किंवा दहशतवादविरोधी कारवायांचे थेट प्रक्षेपण टाळण्यास सांगण्यात आले. अशा कवरेजमुळे शत्रू घटकांना माहिती मिळू शकते, ज्याचा गैरवापर होऊ शकतो.
स्रोत-आधारित बातम्यांवर निर्बंध: अनधिकृत स्रोतांवर आधारित बातम्या किंवा संरक्षण ऑपरेशन्सशी संबंधित माहिती प्रसारित करण्यास मनाई करण्यात आली. यामुळे चुकीच्या माहितीचा प्रसार आणि राष्ट्रीय सुरक्षेला धोका टाळता येईल.
जबाबदार पत्रकारिता: सर्व माध्यम मंच, वृत्तसंस्था, आणि सोशल मीडिया वापरकर्त्यांना कायदा आणि नियमांचे पालन करत जबाबदारीने वृत्तांकन करण्याचे आवाहन करण्यात आले. राष्ट्रीय सुरक्षेच्या हितासाठी संयम आणि सावधगिरी बाळगण्यास सांगण्यात आले.
सामाजिक मीडियावर देखरेख: सोशल मीडिया वापरकर्त्यांना संरक्षण ऑपरेशन्सशी संबंधित रिअल-टाइम व्हिज्युअल्स किंवा माहिती शेअर न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.सरकारने मीडिया चॅनेल्ससाठी जारी केली अॅडव्हायझरी:
अॅडव्हायझरीमध्ये कारगिल युद्ध, मुंबई हल्ला आणि कंधार अपहरण प्रकरणाच्या कव्हरेजची आठवण करून दिली आहे. यांसारख्या घटनांमध्ये अनियंत्रित कव्हरेजचा राष्ट्रीय हितांवर विपरीत परिणाम झाला.
दरम्यान, पहलगाम हल्ल्याने भारत-पाकिस्तानमधील तणाव पुन्हा वाढला आहे. या हल्ल्यासाठी भारताने पाकिस्तानस्थित दहशतवादी गटांना जबाबदार धरत कठोर पावले उचलली, यामध्ये सिंधू जल करार स्थगित करणे, अटारी-वाघा सीमा बंद करणे, आणि पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करणे यांचा समावेश आहे.
या पार्श्वभूमीवर, सुरक्षा ऑपरेशन्सच्या थेट कवरेजमुळे दहशतवाद्यांना माहिती मिळण्याचा धोका वाढला असून, त्यामुळे केंद्र सरकारने माध्यमांना सावधगिरी बाळगण्याचे निर्देश दिले आहेत.