जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणावाची परिस्थिती अधिकच चिघळली. भारताने कारवाईचा इशारा दिला असून, पाकिस्तानकडूनही युद्धसराव सुरू असल्याचं चित्र आहे.
दरम्यान, पहलगाममध्ये सुरू असलेल्या सुरक्षा कारवाईदरम्यान नदीकाठी एका तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. अज्ञात तरूणाचा मृतदेह आढळल्यानंतर सुरक्षा दलावर गंभीर आरोप केले जात असून, या प्रकरणी आता न्यायालयीन चौकशीचे आदेश देण्यात आले आहे.
इम्तियाज अहमद मगरे (वय वर्ष २३) असे मृत तरूणाचे नाव आहे. तो कुलगाम जिल्ह्यातील दमहाल हांजीपोरा भागातील तंगमार्ग गावचा रहिवासी होता. तो मजुरीचे काम करत असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इम्तियाजला पोलिसांनी शनिवारी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याच्यावर दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांना आश्रय दिल्याचा आरोप होता. आरोपी तरूणाने याबाबत काही माहिती पोलिसांनाही दिली होती. मात्र, आता त्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.
यासंदर्भात एक व्हिडिओही समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये इम्तियाज सुरक्षा दलांपासून बचाव करण्यासाठी पळ काढताना दिसत आहे. त्याने पोलिसांच्या हातात तुरी देऊन पळ काढत नदीकाठी पोहोचला तर खरा, पण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. त्यानंतर शोध घेतला असता, रविवारी सकाळी नदीकाठी तरूणाचा मृतदेह आढळला.
तरूणाचा मृत्यू झाल्यानंतर सुरक्षा दलांवर गंभीर आरोप होत आहे. पॉप्युलर डेमोक्रॅटिक पार्टीच्या नेत्या मेहबूबा मुफ्ती यांनी इम्तियाजच्या मृत्यूला कट असल्याचं म्हटलं आहे. सध्या या प्रकरणाला न्यायालयीन चौकशीचे आदेश देण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे.