येवल्यात ‘लुटारू नवरी’ गजाआड; लग्नाच्या नावाखाली 1.79 लाखांना गंडा
येवल्यात ‘लुटारू नवरी’ गजाआड; लग्नाच्या नावाखाली 1.79 लाखांना गंडा
img
वैष्णवी सांगळे
येवला (भ्रमर वार्ताहर) :- येवला शहरातील एका तरुणाला लग्नासाठी मुलगी हवी होती. यादरम्यान त्याची ओळख बुलढाण्यातील ‘माऊली वधू-वर सूचक केंद्रा’चा एजंट सांडू जाधव आणि त्याची पत्नी अलका जाधव यांच्याशी झाली. त्यांनी सरिता नावाच्या मुलीशी लग्न लावून देण्याचे आमिष दाखविले. त्यात लुबाडलेली रक्कम 1 लाख 70 हजार रुपये, वकिलाची फी: पाच हजार रुपये, खरेदीसाठी: चार हजार रुपये असे एकूण 1 लाख 79 हजार रुपये घेऊन पोबारा केला होता.

येवला शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 30 मार्च रोजी बाजीरावनगर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात मोठ्या थाटामाटात विवाह पार पडला; पण लग्नाच्या अक्षता पडताच, नवरीने आपला खरा रंग दाखविला. “माझे येथे कोणीही नाही, मी जिवाचे बरेवाईट करून घेईन,” अशी धमकी देत ती नवरी एजंटच्या घरी पळून गेली आणि नांदण्यास स्पष्ट नकार दिला.फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित तरुणाने येवला शहर पोलीस ठाणे गाठले.

नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि अपर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू व उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक योगेश घोरपडे यांच्या पथकाने चक्रे फिरविली आणि बाजीरावनगर परिसरात सापळा रचून सहा जणांना बेड्या ठोकल्या.

सांडू जाधव (मुख्य एजंट, बुलढाणा), अलका जाधव (बुलढाणा), सरिता पवार (लुटारू नवरी, हिंगोली), प्रवीण जवे (रिक्षाचालक, नाशिक), शशिकला शिंदे (नाशिक), कृष्णाबस्ती जैसवाल (नागपूर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या टोळीने आतापर्यंत महाराष्ट्रात आणखी किती तरुणांना अशाच प्रकारे लुटले आहे, याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते करीत आहेत.
yeola |
इतर बातम्या
Join Whatsapp Group