नाशिक :- 9 हजार रुपयांची लाच घेताना मंडळ अधिकाऱ्यासह एका खासगी इसमास रंगेहाथ पकडण्यात आले आहे. मंडळ अधिकारी पांडुरंग हांडू कोळी (वय ५७) व खासगी इसम विठोबा जयराम शिरसाठ (वय ३२, रा. मुक्काम पोस्ट ठाणगांव, तालुका येवला, जिल्हा नाशिक) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांचे आईचे नांव लक्ष्मी मुक्ती या शासकीय योजने अंतर्गत वडीलांचे सातबारा उताऱ्यावर नांव लावण्यासाठी मंडळ अधिकारी पांडुरंग कोळी यांनी 15000 रुपये लाचेची मागणी केली.नंतर तडजोडी अंती त्यांनी 9000 रुपये लाच स्वीकारण्याचे मान्य केले. त्यांच्यावतीने विठोबा जयराम शिरसाठ यांनी ती लाच स्वीकारली असता त्यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मीरा आदमाने, पो.ना, प्रवीण महाजन, पो.ना किरण अहिरराव, पो.ना. प्रमोद चव्हाणके, चालक पो.ना. परशराम जाधव यांनी केली.