येवला :- शहर परिसरात सुमारे तीन लाखांच्या पैठणी साड्या अज्ञात चोरट्याने चोरून नेल्या. सध्या येवला शहरात व तालुक्यात चोरांनी मोठा उच्छाद मांडला आहे. पैठणीच्या हातमागावर तयार झालेल्या दोन ब्रॅकेट पैठण्या चोरट्यांनी कापून नेल्याची घटना येवला शहरातील नागडे बायपास रोडवरील पैठणी कारखान्यात घडली.
सुमारे तीन लाखाच्या साड्या हातमागावर तयार झालेल्या अखेरचा हात फिरवत असताना भगवान दत्तू गायकवाड यांच्या पैठणी कारखान्यात चोरांनी मध्य रात्रीच्या सुमारास ब्रॉकेट पैठण्या कापून नेल्याची घटना घडली.याबाबत गायकवाड यांनी येवला शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून येवला शहर पोलीस अधिक तपास करीत आहे. तत्काळ पोलिसांनी बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांतून होत आहे.