अयोध्या : सध्या संपूर्ण देशाला अयोध्या राम मंदिरातील मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची उत्सुकता लागली आहे. 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार असून त्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. दरम्यान राम मंदिरात मूर्ती विराजमान झाली असून, भक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. या मूर्तीचा पहिला फोटो समोर आला असून, प्रभू श्रीरामाचं बालरुप डोळे दिपवणारं आहे.
रामललाची संपूर्ण मूर्ती समोर आली आहे. यामध्ये रामललाची संपूर्ण प्रतिमा स्पष्टपणे दिसते. राम मंदिराच्या गर्भगृहात स्थापित केलेली ही मूर्ती म्हैसूरचे (कर्नाटक) शिल्पकार अरुण योगीराज यांनी तयार केली आहे.
51 इंचांची ही मूर्ती त्यांनी काळ्या शाळिग्राम शिळेपासून तयार केली आहे. 200 किलो वजनी मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी 22 जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास जुळून आलेला अवध्या 84 सेकंदांचा अती शुभ योग साधण्यात येणार आहे.