अयोध्येचे श्रीराम मंदिर अवतरले नाशिक नगरीमध्ये
अयोध्येचे श्रीराम मंदिर अवतरले नाशिक नगरीमध्ये
img
Mukund Baviskar
नाशिक (प्रतिनिधी):- संपूर्ण देशभरात अयोध्येतील श्रीराम मंदिर उद्घाटनानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम साजरे होत असताना नाशिक नगरीमध्ये देखील अत्यंत चैतन्यमय आणि उत्साहाच्या वातावरणात ठिकठिकाणी धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम साजरे होत आहेत. त्यातच गंगापूर रोडवरील जेहान सर्कलजवळ ब्रम्हेचा इस्टेट ग्राउंडवर अयोध्येच्या श्रीराम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. 

तसेच श्रीराम मंदिर अयोध्या येथे पूजन केलेला कलश भाविकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आला आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी जमा झालेली रक्कम अयोध्येतील राम मंदिरास देणगी म्हणून देण्यात येईल, अशी माहिती रोहन सुराणा यांनी दिली. प्रभू श्रीरामाची जन्मभूमी अयोध्येत राममंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा देशभरात उत्सव म्हणून साजरा होत असताना श्रीरामाची कर्मभूमी नाशिकही सजली आहे. शहरातील रस्ते भव्य, आकर्षक रांगोळ्यांनी आणि रोषणाईने अधिकच देखणे होत असताना येथील रस्ते, चौक, मठ - मंदिरे, मंगल कार्यालये आणि लॉन्स श्रीराम नामाच्या घोषाने दुमदुमले आहेत.  

प्रभू श्रीरामाची कर्मभूमी असलेल्या नाशिकमध्ये आज अयोध्या येथे होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त उत्सवाचे वातावरण असून विविध कार्यक्रम होत आहेत, मंत्रोच्चार पठण, भजन, पूजा, प्रार्थना, जय घोष इत्यादी धार्मिक विधी व आध्यात्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश आहे. गंगापूर रोडवर जेहान सर्कलजवळ ब्रम्हेचा इस्टेट ग्राउंडवर प्रति आयोध्या मंदिरात दर्शनाचा आनंद भाविकांना घेता येत आहे.

या ठिकाणी आ. देवयानी फरांदे यांच्यासह भाजपचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी भेट देऊनदर्शनाचा लाभ घेतला.   दि. 22 ते 24 जानेवारी दरम्यान सकाळी आठ ते रात्री नऊ वाजेपर्यंत श्रीराम मंदिर अयोध्या येथे पूजन केलेला भव्य कलश दर्शनासाठी ठेवण्यात आला आहे. प्रति अयोध्या गावाचा देखावा, 14 वर्षे वनवास दर्शन, अयोध्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा थेट प्रक्षेपण, धार्मिक गीतांवर आधारित नृत्य संगीत कार्यक्रम, मेळा आणि प्रसाद वाटप असे कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहेत, असेही रोहन सुराणा यांनी सांगितले.  दरम्यान, जैन सोशल ग्रुप प्लॅटिनमच्या वतीने 11 हजार लाडूंचे वाटप शहरात ठिकठिकाणी करण्यात येत आहे. यात श्री काळाराम मंदिर, घोटी टोल नाका, पिंपळगाव नाका, आडगाव नाका येथे भाविकांना लाडू वाटप करण्यात येत आहे, अशी माहिती ग्रुपचे अध्यक्ष दीपेश पारख आणि संचालक निलेश कोचर यांनी दिली.

इतर बातम्या
Join Whatsapp Group