भारतीय संघाने अफगाणिस्तान विरूद्धची मालिका 3 - 0 ने जिंकली. टी 20 वर्ल्डकपपूर्वीची ही भारतीय संघाची शेवटची टी 20 मालिका आहे. आता भारतीय संघ 25 जानेवारीपासून इंग्लंडविरूद्ध 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. 2025 मध्ये होणाऱ्या WTC फायनलसाठी ही मालिका अत्यंत महत्वाची ठरणार आहे.
दरम्यान, भारताचे दोन वरिष्ठ खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली 14 महिन्यानंतर आंतरराष्ट्रीय टी 20 सामना खेळले. आता कसोटी मालिकेपूर्वी त्यांना दोन दिवसांचा ब्रेक देण्यात येणार आहे. बंगळुरू येथील तिसऱ्या टी 20 सामन्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली थेट घरी पोहचले आहेत. आता ते कसोटी संघासोबत 20 जानेवारीला जोडले जाणार आहे.
विराट कोहली सोडून भारतीय प्रशिक्षक स्टाफमधील राहुल द्रविड यांना देखील ब्रेक मिळणार आहे. राहुल द्रविड आणि सपोर्ट स्टाफ देखील शनिवारी हैदराबाद येथे दाखल होणार आहे.
रविंद्र जडेजा, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांना अफगाणिस्तानविरूद्धच्या टी 20 मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली होती. ते आता कसोटी मालिकेपूर्वीच्या चार दिवसाच्या सराव सत्रात दाखल होणार आहेत. भारतीय संघ या कॅम्पमध्ये एक सराव सामना देखील खेळणार आहे.
विराट कोहलीला 22 जावेवारीला अयोध्येत रामलल्लांच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी एका दिवसाची सुट्टी देण्यात आली आहे अशी माहिती मिळत आहे. यासाठी विराट कोहलीने बीसीसीआयकडे परवानगी मागितली आहे.