तब्बल 500 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ...गर्भगृहात विराजमान प्रभू श्रीरामचंद्रांच्या मूर्तीचा पहिला फोटो आला समोर
तब्बल 500 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ...गर्भगृहात विराजमान प्रभू श्रीरामचंद्रांच्या मूर्तीचा पहिला फोटो आला समोर
img
Dipali Ghadwaje
येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्येत राम मंदिरात होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठीची तयारी ही अंतिम टप्प्यात आली आहे. या कार्यक्रमासाठी कडक सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला असून निमंत्रण पत्रिका देखील पाठवण्यात आले आहेत. देशभरातून या सोहळ्याची वाट पाहिली जात आहे. 

यापूर्वी १८ जानेवारी रोजी गर्भगृहात प्रभू श्रीरामाची मूर्ती ठेवण्यात आली आहे. ज्याचा पहिला फोटो देखील समोर आला आहे. अयोध्येत विराजमान होणाऱ्या प्रभू श्रीरामचंद्रांच्या मूर्तीचा पहिला फोटो प्रसिद्ध करण्यात आला आहे.

गर्भगृहातील या फोटोमध्ये मंदिराचे बांधकाम करणारे कामगार हात जोडून उभे असल्याचे दिसत आहे. प्रभू श्रीरामचंद्रांची ही मूर्ती म्हैसूर येथील शिल्पकार अरुण योगीराज यांनी घडवली आहे. या मूर्तीची उंची ५१ इंच इतकी आहे.


मूर्तीला आसनावर स्थापन करण्यासाठी तब्बल चार तासांचा वेळ लागला. मंत्रउच्चार विधी आणि पूजा केल्यानंतर मूर्ती आसनावर विराजमान झाली. यावेळी मूर्तीकार आणि अनेक भाविक देखील उपस्थित होते.
 
बुधवारी रात्री क्रेनच्या साहाय्याने राम मंदिर परिसरात रामलल्लाची मूर्ती आणण्यात आली. त्याचे फोटो देखील समोर आले आहेत. रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी त्यांचे आसनही तयार करण्यात आले आहे. रामलल्लाचे आसन ३.४ फूट उंच आहे, जे मकराना दगडाने बनलेले आहे. 

अयोध्योत बांधण्यात आलेल्या मंदिरात ठेवण्यासाठी तीन मूर्तीकार मूर्तीवर काम करत होते. या तीन पैकी एका मूर्तीची निवड करण्यात आली होती. ही मूर्ती म्हैसूर येथील शिल्पकार अरुण योगीराज यांनी घडवली आहे. दरम्यान १६ तारखेपासूनच राम मंदिरात विविध पूजा विधींची सुरुवात झाली आहे. होम-हवन पार पाडले जात आहेत. २२ तारखेला तर भव्य सोहळा भारतीयांना पाहायला मिळेल. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते राम लल्लाची प्राणप्रतिष्ठा होईल.

इतर बातम्या
Join Whatsapp Group