अयोध्या : अयोध्येत उत्साहाचे वातावरण राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्येत उत्साहाचे वातावरण आहे. अयोध्येतील लता मंगेशकर चौकात उत्साहाच वातावरण दिसून येत आहे. या ठिकाणी राम आणि सीता वेष परिधान करुन बाल कलाकार फिरत आहेत. रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी देशभरातून साधुसंत, महंत, कथावाचक आणि भागवत कथा सांगणारे प्रकांड पंडित पोहोचले आहेत.
अयोध्येतील राम मंदिरात आज (दि. २२) रामलला विराजमान होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दुपारी १२:२० वाजता रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यामुळे बहुप्रतीक्षित प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची प्रतीक्षा अवघ्या काही क्षणांपुरती राहिली आहे. या भव्यदिव्य सोहळ्यासाठी अयोध्यानगरी नववधूप्रमाणे सजली आहे.
या सोहळ्यासाठी अयोध्येतील महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ ते राम मंदिरापर्यंतचा संपूर्ण मार्ग फुलांनी सजवण्यात आला आहे. तसेच, या ऐतिहासिक सोहळ्यासाठी देश- विदेशातील मंदिरांमध्ये उत्सवांचे आयोजन करण्यात आले आहे. सोहळ्यानंतर सायंकाळी देशभरात दीपोत्सव साजरा केला जाणार आहे. दरम्यान, अयोध्येतील ८ एकर जमिनीत हे राम मंदिर उभारलं आहे.
रामललाच्या आरतीवेळी घंटानाद
हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी अयोध्येतील रामललाच्या प्रतिष्ठापणेचा क्षण जवळ आला आहे. रामललाच्या आरतीवेळी घंटानाद करण्यात येणार आहे. तसेच, हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केली जाणार आहे.
रामभक्तांची अयोध्येत उपस्थिती अयोध्येत राम मंदिराच्या प्रत्येक भिंतीवर, प्रत्येक कोनावर आकर्षक फुलांची सजावट केली गेलीय. तर बाहेरही आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. या सोहळ्याला अवघ्या देशातीलच नव्हे जगातील रामभक्तांच्या उपस्थितीने वातावरण राममय झालं आहे.
अयोध्येत रॅपिड अॅक्शन फोर्स तैनात राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अयोध्येत लता मंगेशकर चौकात रॅपिड अॅक्शन फोर्स तैनात करण्यात आले आहे. प्राण प्रतिष्ठेपूर्वी सुरक्षा कठोर करण्यात आली आहे.