अयोध्येत रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आज पूर्ण झाला आहे. 500 वर्षांची प्रतीक्षा संपली आहे. राम मंदिरात रामलल्ला विराजमान झाले आहेत. या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्याची संधी देशातील काही मान्यवरांना मिळाली. बॉलिवूड, खेळ, व्यवसाय क्षेत्रातील अनेक दिग्गजांना या सोहळ्यांचं निमंत्रण मिळालं होतं. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील राम मंदिर लोकार्पण सोहळ्याचं निमंत्रण मिळालं होतं. मात्र तरीही एकनाथ शिंदे अयोध्येला गेले नाहीत.
त्यामुळे एकनाथ शिंदे अयोध्येला का गेले नाहीत, असा प्रश्न अनेकांना पडला होता. अनेकांना पडलेल्या प्रश्नाचं उत्तर स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे. एकनाथ शिंदे यांनी म्हटलं की, आजचं निमंत्रण खरं तर मलाही होतं. मात्र एकट्याने दर्शन घेण्याऐवजी आम्ही सर्व एकत्र अयोध्येला प्रभु रामाचं दर्शन घेण्यासाठी जाणार आहोत. अख्खं मंत्रिमंडळ दर्शनाला जाणार आहे.
महाराष्ट्र, अयोध्या आणि रामलल्लाचं एक वेगळं नातं आहे. आपल्याच महाराष्ट्रातील पंचवटीत त्यांचा वनवास होता. चंद्रपुरातून मंदिरासाठी लाकूड गेलं आहे. हा सोहळा डोळ्याचे पारणं फेडणारा आहे. काही लोकांनी सोहळ्यावर बहिष्कार घातला आहे, त्यांना सद्बुद्धी देवो, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.
राम मंदिर लोकार्पण सोहळ्यात सर्वांनी जातीने सामील झालं पाहिजे. मात्र काही लोक यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. जे रामाचे नाहीत ते कामाचे नाहीत, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विरोधकांना लगावला.