एक वेळा जोराने शंख वाजवला तर हृदयाचे ठोके वाढून मोठा आघात होण्याची शक्यता असते. मात्र पाण्याचा एक थेंबही न पीता अखंडपणे शंख वाजवणे म्हणजे मोठी दैवी देणगी आहे.
नाशिकला झालेल्या कुंभमेळ्यात सलग १९४७ वेळा शंखनाद करून श्री शंखवल्लभ प्रसिद्ध आहेत. आता रामजन्मभूमी अयोध्येत प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात लाखो वेळा शंखनाद करणारे ऋषी शृंगाजींचे वंशज श्री वल्लभ व्यास तथा श्री शंखवल्लभ आकर्षण ठरत आहेत. मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यापासून ते आजच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात त्यांच्या शंखनादाने भाविकांसह उपस्थित संतवृंदाचे लक्ष वेधून घेतले आहे.
हैदराबाद येथून शरयू नदीकाठ, अयोध्या परिसर आणि श्रीराम मंदिराच्या आवारात त्यांच्या शंखाचा ध्वनी गुंजत आहे. श्री शंखवल्लभ हे संपूर्ण भारत देशातील सर्वोत्तम शंखनाद करण्यात प्रसिद्ध आहेत. सर्व कुंभमेळे, मोठे मोठे आध्यात्मिक सोहळे यामध्ये त्यांचा स्वयंस्फूर्तीने सहभाग असतो.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, तेलंगणाचे मुख्यमंत्री, देशातील विविध देवस्थानाचे प्रमुख आदी मान्यवरांनी त्यांच्या शंखाचे विशेष कौतुक केलेले आहे.
अयोध्येतील तत्कालीन काळात झाल्या पुत्रकामेष्टी यज्ञानंतर हजारो वर्षांनी ऋषी शृंगाजींचे वंशज श्री वल्लभ व्यास तथा श्री शंखवल्लभ हे अयोध्या येथे प्रभू श्रीराम यांच्या सोहळ्यात शंखनाद करीत आहेत. रामजन्मभूमी न्यासाचे गोपाळजी महाराज यांची भेट घेऊन श्री शंखवल्लभ यांनी सव्वा लाख वेळा शंखनाद करण्याचा संकल्प केला होता. हा संकल्प पूर्ण होत असल्याचा आम्हाला अभिमान वाटतो अशी प्रतिक्रिया त्यांच्या मातोश्री किरण व्यास यांनी दिली.
सर्व शृंगी ऋषी वंशज सिखवाल, सुखवाल, सेखवाल, श्रीगी, नायक यांच्यासाठी ही अभिमानाने मिरवणारी बाब आहे. श्री शंखवल्लभ यांच्या या पवित्र आणि ऐतिहासिक कार्याचा गर्व आहे असे हैदराबाद येथील सिखवाल समाजाने म्हटले आहे.