अवघ्या देशाला ज्या क्षणाची आतुरता होती, तो ऐतिहासिक क्षण आज आला. उत्तर प्रदेशातील अयोध्येतील राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा पंतप्रधान मोदींच्या हस्ते पार पडली आहे. दुपारी १२ वाजून २९ मिनिटांनी हा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी जय श्रीरामाच्या घोषणांनी अयोध्यानगरी दुमदुमून गेली होती. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची देखील उपस्थिती होती.
अयोध्येत राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आज पार पडला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रमुख यजमान म्हणून पूजा केली. मंदिरात प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी ८४ सेकंदांचा अत्यंत शुभ मुहूर्त होता. शुभ वेळ 12.29 मिनिटे 8 सेकंद ते 12.30 मिनिटे 32 सेकंद इतकी होती. दरम्यान, प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर अयोध्येतील प्रभू राम लल्ला यांचे पहिले रूप समोर आले आहे
आपल्या लाडक्या दैवताचा हा प्राणप्रतिष्ठेचा हा सोहळा अवघ्या देशाने डोळेभरून पाहिला. हा सोहळा पाहताना हजारो डोळ्यांच्या कडा पाणावल्या. कोट्यवधी रामभक्तांचा ऊर अभिमानने भरून आला होता. प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करताना स्वत: मोदीही मंत्रांचे पठन करत होते. मंत्रोच्चार आणि शंखनाद सुरू असताना पंतप्रधान मोदी अत्यंत भावूक झाले होते.
दरम्यान, भगवान श्रीराम यांच्या मूर्तीची पहिली झलक पाहिल्यावर रामभक्तांना भावना अनावर झाल्या होत्या. ‘याची देही याची डोळा, ऐसा देखिला सोहळा’ अशा भावना रामभक्तांनी व्यक्त केल्या.
अयोध्येतील सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करण्यात आल्याने देशातील कोट्यावधी भाविकांनी घरबसल्या प्रभूरामचे दर्शन घेतले.