प्रयागराजमधील महाकुंभात मौनी अमावस्याच्या अमृत स्नानापूर्वी मोठी दुर्घटना घडली. या अमृतस्नानासाठी पाच कोटी भाविक प्रयागराजमध्ये दाखल झाले आहे. त्यामुळे बुधवारी रात्री दीड वाजता चेंगराचेंगरी झाली. त्यात काही भाविकांचा मृत्यू झाला आहे.
विविध आखाड्यांनी स्वता:हून आपले अमृत स्नान रद्द केले. प्रयागराजसारखी गर्दीची परिस्थिती अयोध्या आणि काशीत निर्माण झाली आहे. प्रचंड गर्दीमुळे अयोध्येतील राम मंदिर 18 तास सुरु ठेवले आहे. भाविकांची रांग 20 किलोमीटरपर्यंत गेली आहे. त्यामुळे राम मंदिर ट्रस्टने भाविकांना पुढील 15 दिवस अयोध्येत न येण्याचे आवाहन केले आहे.
प्रयागराजमधील भाविकांच्या प्रचंड गर्दीचा परिणाम उत्तर प्रदेशातील इतर धार्मिक शहरांमध्ये झाला आहे. अयोध्येतील राम मंदिर, काशी-विश्वनाथ मंदिर आणि चित्रकूट या ठिकाणी भाविकांची गर्दी वाढली आहे.
यामुळे रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चपंत राय यांनी भाविकांना अपली केली आहे. महाकुंभातून अयोध्येकडे येणाऱ्या भाविकांना राम मंदिरात न येण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी अयोध्येची असहायता व्यक्त केली. ते म्हणाले की, अयोध्या धामची लोकसंख्या करोडो भाविकांना हाताळण्यास असमर्थ आहे.
चंपत राय यांनी याबाबत एक निवेदन जारी केले आहे. त्यात म्हटले आहे की, सध्या अयोध्येजवळ राहणाऱ्या भाविकांनी राम मंदिराच्या दर्शनासाठी अयोध्येत येणे टाळावे. त्यांनी शक्य असल्यास 15-20 दिवसांनी बसंत पंचमीनंतर अयोध्येत येण्याचे नियोजन करावे. कारण एका दिवसात करोडो भाविकांना रामललाचे दर्शन देणे अत्यंत अवघड आहे.
त्यामुळे भाविकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी यंत्रणांमध्ये योग्य ते बदल करणे गरजेचे झाले आहे. अयोध्येतील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे.