नाशिक : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शिर्डीत पक्षाच्या शिबिरात प्रभू श्रीराम मांसाहारी असल्याचे वक्तव्य केले. यामुळे संपूर्ण राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यानंतर नाशिकच्या साधू महंतांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. काळाराम मंदिर संस्थानचे महंत सुधीर पुजारी यांच्यासह हिंदू धर्मीय नुकतेच पंचवटी पोलीस ठाण्यात वरिष्ठ निरीक्षक अनिल शिंदे यांच्या दालनात पोहोचले आहेत.
दरम्यान जितेंद्र आव्हाडांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे. जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यामुळे तमाम हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, त्यामुळे आम्ही आव्हाडांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करत आहोत, असे काळाराम संस्थानचे पुजारी आणि महंत सुधीर पुजारी यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून सातत्याने अशी वादग्रस्त व्यक्त होत आहेत. शरद पवार यांच्या समोरच सातत्याने अशी वादग्रस्त वक्तव्ये राष्ट्रवादी पक्षाचे नेते करत आहेत. राष्ट्रवादीकडून जातीयवादी वक्तव्ये होत असून शरद पवारांचा त्याला पाठींबा आहे, अशी टीका महंतांनी केली आहे.
दरम्यान रामायणाच्या सहा खंडात राम मांसाहारी होते असा कुठेही उल्लेख नाही. पोलिसात तक्रार दाखल करणार आहोत तसेच आम्ही कोर्टातदेखील जाणार आहोत. ईशनिंदा कायदा महाराष्ट्र आणि केंद्र सरकारने करावा, जेणेकरून हिंदू देवतांची निंदा-नालस्ती थांबेल, अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे.
जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करा अन्यथा पोलीस ठाण्यावर मोर्चा काढू, आनंद परांजपे यांचा इशारा
तर दुसरीकडे जितेंद्र आव्हाड हे हिंदू देवदेवतांविरुद्ध, सनातन धर्माविरुद्ध, हिंदू धर्माविरुद्ध बोलतात आणि धर्माचा अपमान करतात तसेच बहुजन विरु वाघमारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रभू श्री रामाची महाआरती केली म्हणून गोमूत्र शिंपडतात. यामुळे जितेंद्र आव्हाड यांनी, प्रभू श्री रामांविषयी केलेल्या अपमानास्पद वक्तव्याबद्दल, जितेंद्र आव्हाड यांच्यावर येत्या २४ तासात पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही तर वर्तकनगर पोलीस स्टेशनवर मोर्चा काढून पोलीस ठाण्यातच महाआरती करु, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिला आहे.
दरम्यान, तुम्ही निवेदन द्या, आम्ही वरिष्ठांशी बोलून कारवाई करू, असे यावेळी पोलिसांनी म्हटले. मात्र साधू महंत गुन्हा दाखल करून घेण्यासाठी आग्रही आहेत. त्यामुळे आता गुन्हा दाखल होतो का नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.