राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली असून. महिलांची छेडछाड, महिला अत्याचार, बलात्कार अशा घटना दिवसागणिक वाढतच चालल्या आहेत. दरम्यान, अशीच एक घटना समोर आली आहे. एका अनोळखी व्यक्तीने महिलेला नगरसेवकाच्या नावाने कॉल करून त्रास दिल्याची घटना आहे.
हॅलो, मी वडगाव शेरीचा नगरसेवक बोलतोय, असे म्हणत अनोळखी व्यक्तीने भाजीविक्रेत्या महिलेला फोन करून त्रास दिल्याची घटना घडली. हा तोतया नगरसेवक पोलिसांनी शोधून काढला आहे. याप्रकरणी ३० वर्षीय महिलेने चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानूसार, एकाविरूद्ध गुन्हा नोंदवला आहे. ८ डिसेंबर रोजी हा प्रकार रात्री सव्वा सातच्या सुमारास घडला. . प्राथमिक तपासात तो नगरसेवक नसून एक डिलिव्हरी बॉय असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पुढील तपास पोलीस करत आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, महिलेचा चंदननगर परिसरात भाजी विक्रीचा व्यावसाय असून, त्यांचे शॉप आहे. दरम्यान, ८ ते १२ डिसेंबर या चार दिवसांत महिलेला अनोळखी क्रमांकावरून फोन आले. फोन वारंवार येत होते. तो व्यक्ती म्हणत होता की, मला तू आवडतेस, मला तू पाहिजे, बाकी काही बोलू नको, तू फक्त ‘एस ऑर नो’मध्ये बोल. मी वडगाव शेरीचा नगरसेवक बोलतोय. माझ्या आवडत्या व्यक्तीचा नंबर मी कसा पण काढू शकतो, असे म्हणून तो वारंवार फोन करत होता. या सर्व प्रकारामुळे महिलेला काहीच समजत नव्हते. तिने थेट राँग नंबर आहे असे म्हणत फोन बंद देखील केला.
मात्र, तरीही पुन्हा फोन करत त्याने मी मनपाचा नगरसेवक बोलतोय, उद्या येतोच तुझ्या भाजी विक्रीच्या दुकानावर असे म्हणत तक्रारदार यांच्या स्त्री मनास लज्जा केली. महिलेने फोन कट केला. त्यानंतर देखील वारंवार अशा प्रकारे फोन येत होते. तसेच, त्यांना त्रास दिला जात होता. या त्रासाला कंटाळून संबंधित महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे