नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी):- मस्साजोग गावच्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील संशयित आरोपी कृष्णा आंधळे नाशिकरोड मध्ये असल्याची अफवा सोशल मीडियावर वेगाने पसरली होती. नाशिक रोड येथील मुक्तिधाम मंदिर परिसरात तो फिरत असल्याच्या पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्या. या पार्श्वभूमीवर उपनगर पोलिसांनी तातडीने कारवाई करत परिसरात शोधमोहीम राबवली.
मुक्तिधाम मंदिर परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करण्यात आली. तसेच, परिसरातील लॉजिंग रेकॉर्ड तपासले गेले. मात्र, त्या परिसरात आढळलेली व्यक्ती कृष्णा आंधळे नसल्याचे स्पष्ट झाले. फोटोतील व्यक्ती आणि कृष्णा आंधळे यांच्यात कोणतेही साम्य नसल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
अफवांवर विश्वास ठेवू नका
या अफवांमुळे अनावश्यक तणाव निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी नागरिकांना सोशल मीडियावरील अशा अप्रमाणित माहितीवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी स्पष्ट केले की, "सदर पोस्ट अफवा असून त्याला कोणताही आधार नाही. कृपया चुकीच्या माहितीला बळी पडू नका."