नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- संगणकासाठी लागणार्या स्पेअर पार्टच्या गोडाऊनचे कुलूप ड्युप्लिकेट चावीने उघडून गोडाऊनमधील सुमारे 8 लाखांचे साहित्य चोरुन नेणार्या चोरट्यास पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी हर्षल राजेंद्रकुमार टोकसे (रा. नारायणबापूनगर, जेलरोड, नाशिकरोड) यांचे गंजमाळ परिसरात सुपर मार्केट शॉपमध्ये गाळा नं. 17 येथे गोडाऊन आहे. या गोडाऊनचे कुलूप संशयित तोहिल शकिल सय्यद (रा. खडकाळी, जुने नाशिक) याने ड्युप्लिकेट चावीच्या सहाय्याने उघडून गोडाऊनमध्ये प्रवेश केला.
त्यावेळी गोडाऊनमध्ये असलेले झेबियन कंपनीचे 20 इंची 33 मॉनिटर, 22 इंची 34 मॉनिटर, 22 इंची आयपीएस मॉनिटर 4 नग, 24 इंची आयपीएस मॉनिटर 10 नग, 27 इंची आयपीएस कर्व्ह मॉनिटर 2 नग, 32 इंची मॉनिटर 2 नग तसेच झेबियन कंपनीचे 200 नग किबोर्ड, जिओनिक्स कंपनीचे रॅम व एसएसडीचे 100 नग असे एकूण 8 लाख रुपये किंमतीचे संगणकाचे साहित्य चोरुन नेले.
याप्रकरणी टोकसे यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी तपास करुन तोहिल सय्यद या चोरट्यास अटक केली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत.