विंचूर चौफुलीवर कंटेनरसह एक कोटी रुपयांचे विदेशी मद्य जप्त
विंचूर चौफुलीवर कंटेनरसह एक कोटी रुपयांचे विदेशी मद्य जप्त
img
Dipali Ghadwaje
 नाशिक (प्रतिनिधी) :- गोव्यात बनविलेला व महाराष्ट्रात विक्रीस बंदी असलेला कंटेनरसह तब्बल सुमारे एक कोटी रुपयांचा मद्यसाठा राज्य उत्पादन शुल्क विभागाने येवल्याजवळ विंचूर चौफुलीवर जप्त केला.

याबाबत माहिती अशी, की गोवा राज्यात निर्मित व महाराष्ट्रात विक्रीस बंदी असलेला विदेशी मद्यसाठा एका कंटेनरमधून येत आहे, अशी खबर मिळताच येवला विभाग राज्य उत्पादन शुल्क विभागाने वेगवेगळी पथके बनवून निफाड आणि विंचूर शहर परिसरात सापळे रचून अपेक्षित सहाचाकी कंटेनर तपासण्यासाठी सर्वच वाहनांची तपासणी सुरू केली. त्यात विंचूर चौफुलीवर पवन स्वीट मार्टजवळ सहाचाकी कंटेनर क्रमांक एमएच 48 सीबी 4773 हा आढळला. त्याच्या चालकाकडे विचारपूस केली असता त्याने मद्याबाबत प्रारंभी उडवाउडवीची उत्तरे दिली.

शेवटी ट्रकची तपासणी केली असता रॉयल ब्ल्यू व्हिस्की 180 मिलीलिटरच्या 52 हजार 800 बाटल्या 11 बॉक्समध्ये पॅकबंद अवस्थेत या कंटेनरमध्ये आढळल्या. त्यामुळे पोलिसांनी कंटेनर व त्यात आढळलेले मद्य व मोबाईल यांसह 1 कोटी 9 लाख 53 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला व कंटेनरचालक कैलास पांडू लष्कर (वय 33, रा. शासकीय दूध डेअरी रोड, पाण्याच्या टाकीजवळ, चक्कर बर्डी, धुळे) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार विभागीय राज्य उत्पादन शुल्क डॉ. बा. ह. तडवी, नाशिक विभाग राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक शशिकांत गर्जे, उपअधीक्षक हर्षवर्धन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली येवला विभाग राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक विठ्ठल चौरे, दुय्यम निरीक्षक संजय वाक्‌‍चौरे, प्रवीण मंडलिक, सहाय्यक दुय्यम निरीक्षक अवधूत पाटील आणि जवान संतोष मुंढे, विठ्ठल हाके, अमन तडवी व मुकेश निंबेकर यांनी यांच्या पथकाने ही कामगिरी यशस्वी केली. पुढील तपास दुय्यम निरीक्षक संजय वाक्‌‍चौरे हे करीत आहेत.

व्हिडीओ बघण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा 


इतर बातम्या
Join Whatsapp Group