मोबाईलवर ॲप इन्स्टॉल करण्यास सांगून  वृद्धाची 11 लाख रुपयांची फसवणूक
मोबाईलवर ॲप इन्स्टॉल करण्यास सांगून वृद्धाची 11 लाख रुपयांची फसवणूक
img
DB
नाशिक (प्रतिनिधी) :- कस्टमर केअरमधून बोलत असल्याचे भासवून वृद्धास ॲप इन्स्टॉल करण्यास सांगून त्यांच्या खात्यातून 11 लाख रुपयांची रोकड परस्पर काढून घेत एका भामट्याने फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.

फिर्यादी दामोदर भास्कर भिडे (वय 83, रा. ऑस्कर प्राईड बिल्डींग, दातेनगर, गंगापूररोड) असे फसवणूक झालेल्या वृद्धाचे नाव आहे. 
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी दामोदर भिडे यांना 28 डिसेंबर रोजी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास 8601231122 या मोबाईल क्रमांकावर अज्ञात इसमाने फोन केला.

तसेच त्याआधी व्हॉट्स ॲपवरुन भिडे यांना टेक्स्ट मॅसेज केला. त्याने आयसीआयसीआय डायरेक्ट कस्टमरकेअरमधून बोलत असल्याचे भासवले. त्यानंतर बँक ऑफ बडोदाचे शेअर्स त्यांच्या डिमॅट अकाऊंटमध्ये जमा करण्याचा बहाणा करुन फिर्यादी भिडे यांना त्यांच्या मोबाईलमध्ये एनीडेक्स नावाचे ॲप इन्स्टॉल करण्यास सांगितले.

त्या अज्ञात इसमाच्या बोलण्यावर विश्वास ठेवून फिर्यादी भिडे यांनी हे ॲप इन्स्टॉल केले. त्यानंतर आरोपीने त्याचा ॲक्सेस मिळवून त्याद्वारे एकूण 10 लाख 84 हजार 522 रुपयांची रक्कम भिडे यांच्या संमतीशिवाय टप्प्या टप्प्याने इतर बँक खात्यांवर परस्पर वर्ग करुन फिर्यादी भिडे यांची आर्थिक फसवणूक केली. 

याबाबत अज्ञात मोबाईलधारक तीन जणांविरुद्ध सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेख करीत आहे. 


इतर बातम्या
Join Whatsapp Group