त्र्यंबकेश्वर मंदिरात रविवारी एका भाविकाला मारहाण केल्याचा व्हिडीओ समोर आला होता. सोशल मीडियावर हा व्हिडीओ वेगाने पसरला आहे. या व्हिडिओमध्ये मंदिरातील सुरक्षाररक्षकांनी भाविकाला अक्षरश: कपडे फाटेपर्यंत मारल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या घटनेवर अनेकांकडून संताप व्यक्त करण्यात येत होता. दरम्यान आता याबाबत मंदिर प्रशासनाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त कैलास घुले यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
कैलास घुले काय म्हणाले ?
त्र्यंबकेश्वर मंदिराच्या दर्शन रांगेत भाविकाला झालेली मारहाण ही वस्तू स्थितीला धरून नाही. या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता सदरचा भाविक हा पावणे सहाच्या सुमारास मंदिरात आला. यानंतर दर्शन बारीत तो साधारणता एक तास ध्यान साधनेसाठी बसला होता. मात्र, दर्शनासाठी गर्दी वाढल्यामुळे भाविकांना मंदिरात येण्यासाठी अडथळा निर्माण झाला. त्यामुळे सुरक्षा रक्षकांनी त्याला उचलून दक्षिण बाजूच्या दर्शन बारीत बसवले. याच दक्षिण बाजूच्या दर्शन बारीतून बाहेर पडणाऱ्या भाविकांना रेटारेटी करून तो आतमध्ये आला. त्याने मंदिराच्या गाभार्यात प्रवेश करण्यासाठी कपड्यांवर जाण्याचा आग्रह धरला.
त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गाभार्यात दर्शनासाठी जाण्याकरिता सोहळे नेसून जाण्याची परंपरा आहे. ती मोडून भाविकाने आत जाण्याचा प्रयत्न केला असता त्याला गाभार्याच्या उंबर्यावरील एका सुरक्षा रक्षकाने हटकले. मात्र, त्याने जास्त उदिग्न होऊन सुरक्षा रक्षकालाच शिवीगाळ केली. यावेळी एका सुरक्षा रक्षकाच्या स्वेटरला त्याने गुंडाळले आणि त्याचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला. यात सुरक्षा रक्षकाच्या डोळ्याला जखम झाली. यानंतर तो ओरडायला लागल्याने इतर सुरक्षा रक्षकांनी त्याला चोप दिला. त्यानंतर त्यांनी त्या भाविकाला उचलून मंदिराबाहेर काढले
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणानंतर सगळ्या विश्वस्तांनी त्या भाविकाला समज दिली. मात्र, यावेळी त्याने ड्रग्ज घेतल्याचे आमच्या लक्षात आल्याने आम्ही तात्काळ पोलिसांशी संपर्क साधला. यानंतर पोलिसांनी त्याची चौकशी केली असता तो एका चांगल्या घरातील मुलगा होता, परंतु ड्रग्जच्या आहारी गेलेला होता, असे निदर्शनास आले. शेवटी त्याने झालेल्या प्रकाराबद्दल माफी मागितली आणि निघून गेला, असे कैलास घुले यांनी सांगितले.