स्टँड-अप कॉमेडियन समय रैनाचा जागतिक विक्रम! ८ कोटींचे नुकसान सोसूनही 'स्टिल अलाइव्ह'ची युट्यूबवर हवा
स्टँड-अप कॉमेडियन समय रैनाचा जागतिक विक्रम! ८ कोटींचे नुकसान सोसूनही 'स्टिल अलाइव्ह'ची युट्यूबवर हवा
img
दैनिक भ्रमर



मुंबई: भारतीय डिजिटल विश्वात स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण करणारा स्टँड-अप कॉमेडियन आणि यूट्यूबर समय रैना सध्या त्याच्या 'स्टिल अलाइव्ह' या स्टँड-अप शो मुळे जागतिक स्तरावर चर्चेत आला आहे. गेल्या १४-१५ महिन्यांचा प्रदीर्घ संघर्ष आणि अनेक वादांना तोंड दिल्यानंतर, समयने यूट्यूबवर अशा प्रकारे पुनरागमन केले आहे की, त्याने थेट जागतिक विक्रमांना गवसणी घातली आहे. 

जागतिक विक्रमी कामगिरी

समय रैनाचा १ तास २१ मिनिटांचा 'स्टिल अलाइव्ह' हा व्हिडिओ यूट्यूबवर जगातील 'सर्वात जास्त पाहिला जाणारा पूर्ण लांबीचा स्टँड-अप कॉमेडी स्पेशल' ठरला आहे. ७ एप्रिल रोजी रिलीज झालेल्या या व्हिडिओने अवघ्या २४ तासांत २ कोटी २० लाख व्ह्यूज मिळवले होते, तर आतापर्यंत या व्हिडिओने ५ कोटी ४३ लाखांहून अधिक व्ह्यूजचा टप्पा ओलांडला आह. या यशाने त्याने जगातील अनेक दिग्गज कॉमेडियन्सनाही मागे टाकले आहे. 

८ कोटींचे नुकसान आणि मानसिक दडपण

हे यश समयसाठी इतके सोपे नव्हते. जानेवारी २०२५ मध्ये 'इंडियाज गॉट लेटेंट' या शोमधील काही विधानांमुळे मोठा वाद निर्माण झाला होता. या वादामुळे आणि त्यातून उद्भवलेल्या कायदेशीर प्रक्रियेमुळे समयला त्याचे अनेक व्हिडिओ आणि लोकप्रिय शो यूट्यूबवरून हटवावे लागले होते.

 एका ताज्या मुलाखतीत त्याने खुलासा केला की, हा शो बंद ठेवावा लागल्याने आणि अनेक मोठ्या ब्रँड्सनी पाठ फिरवल्यामुळे त्याचे सुमारे ८ कोटी रुपयांचे थेट आर्थिक नुकसान झाले आहे. या कठीण काळात आपण 'सायकोसिस' सारख्या मानसिक स्थितीचाही सामना केला असल्याचे त्याने प्रांजळपणे मान्य केले आहे.  

काश्मिरी संघर्षाची भावनिक बाजू 

केवळ विनोदच नाही, तर समयने अलीकडेच आपल्या कौटुंबिक इतिहासातील थरारक अनुभवही जगासमोर मांडले आहेत. १९९० च्या दशकात काश्मीरमध्ये जेव्हा अशांतता पसरली होती, तेव्हा समयचे आजोबा दहशतवाद्यांच्या 'हिट लिस्ट'वर होते. मात्र, अशा कठीण काळात त्यांच्या गावातील स्थानिक मुस्लिमांनीच पुढाकार घेऊन त्यांच्या कुटुंबाला सुरक्षितपणे बाहेर काढण्यास मदत केली होती, अशी हृदयस्पर्शी आठवण त्याने सांगितली. यामुळे माणुसकी धर्माची एक वेगळी बाजू सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. 

'इंडियाज गॉट लेटेंट' सीझन २ आणि भविष्यातील वाटचाल

इतक्या मोठ्या आर्थिक धक्क्यानंतरही समय खचलेला नाही. त्याने अधिकृतपणे जाहीर केले आहे की, तो लवकरच 'इंडियाज गॉट लेटेंट'चा दुसरा सीझन घेऊन परतत आहे. इंस्टाग्रामवर ८ दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स असलेला समय आपल्या अनोख्या शैलीने पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याच्या या 'कमबॅक'ने हे सिद्ध केले आहे की, डिजिटल युगात जर आशय दमदार असेल, तर कोणताही वाद कलाकाराला रोखू शकत नाही.
इतर बातम्या
Join Whatsapp Group