बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांना आणखी एक यश मिळाले आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणातील पाचव्या आरोपीला अटक केली आहे. मुंबई पोलिसांच्या गु्न्हे शाखेने राजस्थानमधून आरोपीच्या मुसक्या आवळल्या.
मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने राजस्थानमधून अटक केलेल्या आरोपीचे नाव मोहम्मद रफिक चौधरी असे असल्याची माहिती समजतेय. चौधरी याने या प्रकरणात अटक केलेल्या सागर पाल आणि विकी गुप्ता या दोन शूटर्सना पैसे आणि रेकी करण्यासाठी मदत केली होती. आरोपी चौधरी याला आज पोलीस मुंबईत आणणार असून त्याला न्यायालयात हजर करत पोलीस कोठडीची मागणी करणार असल्याची माहिती आहे.
सलमान खानच्या घरावर गोळीबार
14 एप्रिल रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास दोन दुचाकीस्वारांनी अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार केला होता. या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली. मुंबई पोलिसांनी तातडीने या प्रकरणाचा तपास सुरू केला. या घटनेची जबाबदारी तुरुंगात असलेला गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई याचा भाऊ अनमोल बिष्णोई याने घेतली. घटनास्थळापासून काही अंतरावर पोलिसांना गुन्ह्यात वापरलेली दुचाकी सापडली होती. सीसीटीव्ही फूटेजमध्ये पोलिसांना आरोपींचे चेहरे दिसले. या घटनेच्या 72 तासांच्या आत मुंबई पोलिसांनी गुजरातमधून आरोपींच्या मुसक्या आवळल्या.