मुंबई : ज्येष्ठ शास्त्रीय गायिका माणिक भिडे यांचं आज वृद्धापकाळानं निधन झालं. वयाच्या ८८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. माणिक भिडे यांच्या निधनानं शास्त्रीय संगीत क्षेत्रात कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे. अनेक लोकप्रिय गायकांचा गुरु हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे. माणिक भिडे यांच्या निधनाची बातमी कळताच संगीत क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
माणिक भिडे यांनी अनेक प्रसिद्ध गायक आणि गायिकांना आपल्या तालिमीमध्ये घडवले होते. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांकडून श्रद्धांजली वाहिली जात आहे.
माणिक भिडे या मुळच्या कोल्हापुरच्या होत्या. गोविंदराव भिडे यांच्याशी लग्न झाल्यानंतर त्या मुंबईमध्ये आल्या होत्या. गोविंदराव भिडे यांच्या घरी देखील संगीताचेच वातावरण होते. त्यामुळे त्यांच्या सासरच्या मंडळींचा सुनेने देखील गाणेच करावे असा हट्ट होता.
गानसरस्वती किशोरी आमोणकरांच्या सर्वश्रुत शिष्या म्हणून त्यांची पहिली १७ वर्षांची कारकीर्द घडली. त्यानंतर माणिक भिडे यांनी कन्या अश्विनी भिडे-देशपांडे यांच्यासह इतर अनेक शिष्यांना तालीम देत स्वतःला गुरू म्हणून घडवले होते. यामध्ये माया धर्माधिकारी, प्रीती तळवलकर, ज्योती काळे, संपदा विपट, गीतीका वर्दे यासह अनेक गायकांना त्यांनी घडवलं.
महाराष्ट्र सरकारच्या २०१७ च्या बहुमानाच्या 'पं भीमसेन जोशी जीवनगौरव पुरस्कार' यासह अनेक महत्वाच्या पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले होते. गेली काही वर्षे त्यांना पार्किन्सन्स ह्या असाध्य व्याधीने ग्रासले होते. त्याच्यावर उपचार देखील सुरु होते. अशातच आज आजारपण आणि वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले. त्यांच्या मृत्यूने संगीतविश्वाची अपरिमित हानी झाली आहे.