आखाती देशातील युद्धामुळे जगभरात तणावाचं वातावरण आहे. अनके देशामंध्ये इंधनाचे दर तर गगनाला भिडले आहेत. इंधन टंचाईमुळे काही देशांत तर थेट लॉकडाऊन लावण्यात आलेले आहे. पाकिस्तानातील हालत देखील दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. पाकिस्तानातील इंधनाचे दर तर सर्वसामान्यांना घाम फोडणारे आहेत. हे दर ऐकून तुम्हांलाही हादरा बसेल.
एका न्यूज एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानचे पेट्रोलियम मंत्री अली परवेझ मलिक यांनी अर्थमंत्री मुहम्मद औरंगजेब यांच्यासोबत एका पत्रकार परिषदेत सांगितले की, पेट्रोलच्या दरात 137.24 रुपयांनी आणि डिझेलच्या दरात 184.49 रुपयांनी प्रति लिटर वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे या दरवाढीनंतर पाकिस्तानमध्ये पेट्रोलचा दर आता प्रति लिटर 321.17 रुपयांवरून 458.41 झाला असून, हाय-स्पीड डिझेलचा दर 335.86 वरून 520.35 प्रति लिटर झाला आहे. हे नवीन दर आजपासून, म्हणजेच 3 एप्रिलपासून लागू झाले आहेत. याआधी महिन्याभरापूर्वी 6 मार्च रोजी पाकिस्तानमध्ये पेट्रोल प्रति लिटर 48.07 ने आणि डिझेल प्रति लिटर 61.78 रुपयांनी महाग झाले होते.
सध्याच्या करन्सी एक्स्चेंज दरानुसार, 1 पाकिस्तानी रुपया 0.33 भारतीय पैशांच्या बरोबर आहे. त्यानुसार, पाकिस्तानमध्ये पेट्रोलची नवीन किंमत भारतीय रुपयांमध्ये अंदाजे 152.60 रुपये प्रति लिटर आहे आणि डिझेलची किंमत 173.23 रुपये आहे. दिल्लीमध्ये नॉर्मल पेट्रोलची किंमत 94.77 रुपये प्रती लिटर आहे. म्हमजेच पाकिस्तानमध्ये पेट्रोल हे भारतापेक्षा 57.83 रुपयांनी महाग आहे. तसचे दिल्लीत डिझेलची किंमत 87.67 रुपये असून पाकिस्तानमध्ये डिझेल भारतापेक्षा 85.56 रुपयांनी महाग आहे.