मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नव्या पुतळ्यासंदर्भात महत्त्वाची माहिती दिलीय. ‘माझी माती, माझा देश’ कलश यात्रेच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले होते. त्यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. “प्रत्येक गावा-गावातून, घरातून नागरिक ‘माझी माती, माझा देश’ कार्यक्रमाशी जोडलेले आहेत. आज विशेष ट्रेन इथून दिल्लीला रवाना होईल, तिथे हे सारे कलश एकत्र होतील” असं मुख्यमंत्री म्हणाले
लंडनहून छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं आणण्यात येणार आहेत, त्या बद्दलच्या प्रश्नालाही एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं. “आमचे मंत्री सुधीर मुनगंटीवार स्वत: लंडनला गेले. जी वाघनखं आहेत, त्याला इतिहास आहे आणि ती वाघनखं आपल्या देशात, राज्यात, महाराष्ट्रात आणणं प्रत्येक देशवासियासाठी गौरवास्पद अभिमानास्पद आहे, प्रत्येकाल हेवा वाटावं असं हे देशाभिमानी काम आहे” असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
तसेच, भारत-पाकिस्तानच्या सीमेवर छत्रपती शिवरायांचा अश्वारुढ पुतळा उभारला जाणार असल्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य अश्वारुढ पुतळा आम्ही इथून पाठवला आहे. भारत पाकिस्तान सीमेवर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची स्थापना केली जाणार आहे. पाकिस्तानला देखील छत्रपती शिवरायांच्या तलवारीची भिती वाटेल."