नवी दिल्ली : केंद्र सरकारने सुरू केलेल्या पंतप्रधान जनधन योजनेत आतापर्यंत ५१ कोटी लोकांनी बँक खाती उघडलेली आहेत. मात्र, त्याचवेळी १० कोटींपेक्षा अधिक खाती बंद पडली आहेत. बंद खात्यांत तब्बल १२ कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा असून, हे पैसे घ्यायला कोणीही पुढे आलेले नाही. केंद्रीय वित्त मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, बंद खात्यांपैकी ४.९३ कोटी खाती महिलांची आहेत. अनेक महिने खात्यावर व्यवहार न झाल्यामुळे ही खाती बंद करण्यात आली आहेत.
रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार, सलग दोन वर्षे व्यवहार न झाल्यास खाते निष्क्रिय मानले जाते. एका अहवालानुसार, बंद पडलेल्या १० कोटी जनधन खात्यांत एकूण १२,७७९ कोटी रुपये जमा आहेत.
ग्रामीण भागातील लोकांना बँकिंग व्यवस्थेशी जोडण्यासाठी २०१४ मध्ये जनधन योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेत अवघ्या १ रुपयात बँक खाते उघडण्यात येते. या खात्यात किमान शिल्लक रक्कम ठेवण्याची गरज नाही. गरिबांना सरकारी योजनेचा लाभ मिळवून देण्यात या खात्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आहे.
पुन्हा सुरू करता येईल?
तुमचे बँक खाते बंद पडलेले असल्यास ते पुन्हा सुरू करता येते. त्यासाठी बँकेत जाऊन खाते पुन्हा सुरू करण्याचा अर्ज द्यावा लागेल. त्यानंतर केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. प्रक्रिया पूर्ण होताच खाते पुन्हा सुरू होईल. बंद जनधन खात्यांचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न बँकांकडून सुरू आहे. विविध माध्यमांतून खातेधारकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न बँकांकडून केला जात आहे.