राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांच्यावर शरद पवार यांनी नवी जबाबदारी सोपवली आहे. अमोल कोल्हे यांची पक्षाचे लोकसभेमधील चिफ व्हीप अर्थात मुख्य प्रतोद म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याबद्दल अमोल कोल्हे यांनी एक पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
काय आहे अमोल कोल्हेंची पोस्ट?
अमोल कोल्हे एक्स पोस्टमध्ये म्हणाले, “एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा कधीतरी लोकसभेत पक्षाचा उपनेता, मुख्य प्रतोद होऊ शकतो अशी कल्पनाही कोणी केली नसेल. परंतु शरद पवार आणि आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या सर्वसमावेशक धोरणामुळे हे शक्य झाले.”अमोल कोल्हे एक्स पोस्टमध्ये म्हणाले, “एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा कधीतरी लोकसभेत पक्षाचा उपनेता, मुख्य प्रतोद होऊ शकतो अशी कल्पनाही कोणी केली नसेल. परंतु शरद पवार आणि आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या सर्वसमावेशक धोरणामुळे हे शक्य झाले.”
“ही मोठी जबाबदारी आहे याची मला जाणीव आहे. ही जबाबदारी पेलण्याचं बळ माझ्या शिरुर लोकसभा मतदारसंघातील जनतेचे आशिर्वाद आणि शुभेच्छांमुळे मिळतेय ही माझ्यासाठी मोलाची बाब आहे. लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिरात माझ्या नावाची पाटी लागली. हा माझ्यासह शिरूर लोकसभा मतदारसंघातील मायबाप जनतेचा, महाराष्ट्रातील तमाम शेतकरी कामगार कष्टकरी जनतेचा सन्मान आहे. माझ्यावर हा विश्वास दर्शवल्याबद्दल आदरणीय शरदचंद्रजी पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि माझे संसदेतील सर्व सहकारी यांचे मनापासून आभार!”, असंही अमोल कोल्हे म्हणाले.
अमोल कोल्हेंनी राखलं मैदान
अमोल कोल्हे यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघातून २०२४ ची निवडणूक लढवली होती. त्यांच्याविरोधात अजित पवार गटाचे आढळराव पाटील यांचं आव्हान होतं. या दोन्ही उमेदवारांत अटीतटीची लढत झाली. परंतु, या लढतीत अमोल कोल्हे यांनीच मैदान मारलं. आता शरद पवार गटाचे लोकसभेत ९ खासदार आहेत. त्यामुळे अमोल कोल्हे यांना मुख्य प्रतोदपदी निवड करण्यात आली आहे. अमोल कोल्हे यंदा दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले आहेत.