इम्फाळ (भमर वृत्तसेवा) :- सिक्कीममध्ये अचानक ढगफुटी झाली आहे. त्यामुळे उत्तर सिक्किममधील तिस्ता नदीला पूर आल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.
दरम्यान, येथे तैनात करण्यात आलेले 23 लष्करी जवान बेपत्ता असल्याचीही माहिती आहे. त्यांना शोधण्याचे काम सुरू असून याबाबत मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग यांनी परिस्थितीचा आढावा घेतला आहे.
खोऱ्यातील काही लष्करी आस्थापना प्रभावित झाल्या आहेत. 23 लष्करी जवान बेपत्ता असल्याची माहिती मिळाली असून काही वाहने गाळाखाली दबल्याची माहिती आहे. चुंगथांग धरणातून पाणी सोडण्यात आल्याने 15-20 फूट उंचीपर्यंत पाण्याच्या पातळीत अचानक वाढ झाली. त्यामुळे पूर आला, अशी माहिती एका लष्कराच्या एका अधिकाऱ्याने दिली आहे.
सिक्कीममध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे. उत्तर सिक्कीममधील ल्होनाक सरोवरावर झालेल्या ढगफुटीमुळे तिस्ता नदीची पाण्याची पातळी वाढली. सिक्कीम आणि पश्चिम बंगालमधून वाहणारी ही नदी बांगलादेशात जाते. दरम्यान, सिक्कीम प्रशासनाने हाय अलर्ट जारी केला आहे. ढगफुटीमध्ये कोणीही जखमी झाले नाही. परंतु सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले आहे. सिंगताममध्ये काही लोक बेपत्ता असल्याची देखील माहिती मिळाली आहे. मदतकार्य सुरू आहे, अशी माहिती मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग यांनी दिली.