नाशिक : राज्यात ऑगस्ट महिन्यात पावसाने दडी मारली होती. संपूर्ण ऑगस्ट महिना कोरडा गेल्याने बळीराजा संकटात सापडला होता. मात्र, पावसाने पुनरागमन केले आहे त्यामुळे बळीराजा काहीसा सुखावला आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार राज्यात बहुतांश भागात आज सकाळपासून पावसाने हजेरी लावली आहे.
जिल्ह्यातील बहुतांश भागात आज सकाळपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. दरम्यान नाशिक शहरासह ग्रामीण भागात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने परिसरात झालेल्या पासवामुळे नागरिक सुखावले. खरीप हंगामातील पिके करपू लागल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले होते. त्यामुळे पाऊस पुन्हा कधी कोसळणार याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या होत्या. त्यामुळे सकाळपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावल्याने बळीराजा काहीसा सुखावला आहे.
तर शहरात पावसामुळे रस्त्यावर सर्वत्र पाणी साचले आहे . याचा परिणाम वाहतुकीवर झाला असून सकाळपासून अनेक ठिकाणची वाहतूक ही संथ गतीने पुढे जात आहे.
गेल्या अनेक दिवसापासून राज्यात पावसानं दडी मारली होती. मात्र, आज राज्याच्या काही भागात पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे बळीराजा खुश झाला आहे. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, पेठ, कळवण, सटाणा, इगतपुरी, देवळा, मालेगाव, मनमाड या तालुक्यांत काल रात्रीपासून पावसाने जोरदार हजेरी लावली. त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी तालुक्यात पावसाने रात्री आणि दुपारी जोरदार हजेरी लावल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण पसरले असून भात पिकांना संजीवनी मिळाली आहे. महिनाभराच्या प्रतिक्षेनंतर पाऊस झाल्याने पिकांना दिलासा मिळाला आहे.