सध्या राज्यभरात पावसाने धुमाकूळ घातला आहे. पावसाच्या बॅटिंगमुळे धरणे, नद्यांवरील प्रेक्षणीय स्थळे खुलली असून पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. मात्र या पर्यटनस्थळांवर हुल्लडबाजांना आवर घालण्याचे मोठे आव्हान पोलीस प्रशासनासमोर आहे. अशा हुल्लडबाज पर्यटकांविरोधात नाशिक पुणे पोलिसांनी कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे.
नाशिक जिल्ह्यातील तसेच परजिल्ह्यातील पर्यटक इगतपुरी, वाडिवऱ्हे, त्र्यंबकेश्वर, गंगापूर व बॅकवाॅटर येथे येऊन निसर्गाचा आनंद लुटतात. मात्र त्यासोबत काही हुल्लडबाज, मद्यपी या ठिकाणी येत असल्याने पर्यटन सहलींना काही वेळेस गालबोट लागते.
याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तसच पहीने परिसरातील धबधब्यांवर पर्यटक मोठ्या प्रमाणावर गर्दी करत आहेत. मात्र त्र्यंबकेश्वर, पहिने येथे येणाऱ्या पर्यटकांना रविवारी (दि.२१) पोलिसांच्या नाकाबंदीचा सामना करावा लागला. त्यानंतर ग्रामीण पाेलिसांनी चार ठिकाणी नाकाबंदी करीत मद्यपी चालक, हुल्लडबाज, ट्रिपल सीट चालकांवर कडक कारवाईचा बडगा उगारला आहे.
सुट्टीचे दोन्ही दिवशी ग्रामीण पोलिसांनी यावेळी खबरदारी घेतली. त्यानंतर पोलिस अधिक्षक विक्रम देशमाने यांच्या सुचनांनुसार ग्रामीण पोलिसांनी पर्यटन स्थळांवर नाकाबंदी करीत वाहन तपासणी केली. शनिवार व रविवारी (दि.२० व २१) पहिने येथे बंदोबस्तासह चार ठिकाणी पाॅईंट लावुन नाकाबंदी करण्यात आली.
दरम्यान, बंदोबस्तासाठी पोलीस मुख्यालयातील १ अधिकारी ६ अंमलदार, वाडीवऱ्हे पोलिस ठाण्याचे २ अधिकारी १० अंमलदार तैनात होते. वाहनांची तपासणी करीत मद्यसाठा नेणाऱ्यांवर कारवाई केली. तपासणी होत असल्याने अनेकांनी दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा बेत आखला.
७८ चालकांवर दंडात्मक कारवाई
मद्य नेणाऱ्यांवरही पोलिसांनी अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला. तर, बंदोबस्तादरम्यान, मद्यसेवन करून वाहन चालवणाऱ्या ९ चालकांवर पाेलिसांनी कारवाई केली. तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ७८ चालकांवर दंडात्मक कारवाई केली. त्यात ७२ हजार ५०० रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे.