महाराष्ट्रात पुढील ३ दिवस तुफान पाऊस बरसणार, हवामान खात्याचा अंदाज
महाराष्ट्रात पुढील ३ दिवस तुफान पाऊस बरसणार, हवामान खात्याचा अंदाज
img
Dipali Ghadwaje
ऑगस्टमध्ये पावसाने ओढ दिल्यानंतर सप्टेंबरमध्ये वरूणराजा बरसायला सुरूवात झालीय, पुढील ३ दिवस राज्यातील विविध ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केलाय. राज्याच्या सर्वच भागात आज वादळीवाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. 

महिनाभराच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर राज्यात पुन्हा एकदा पावसाने जोरदार पुनरागमन केलंय. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना मोठा दिलासा मिळाला असून बळीराजा सुखावला आहे. 

दरम्यान, राज्यात येत्या दोन ते तीन दिवसात पावसाचा आणखीच जोर वाढणार असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. हवामान विभागाने मुंबई, ठाणे, तसेच पालघरमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.  यात उत्तर कोकण, मराठवाडा, उत्तर मध्य महाराष्ट्र, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भासह गोव्याचाही समावेश आहे. तसेच मुंबईसाठी आज आणि उद्या ग्रीन तर, रविवारी यलो अलर्ट देण्यात आलाय. 

मुंबईसह ठाण्याला यलो अलर्ट
याशिवाय रायगड, रत्नागिरी, आणि सिंधुदूर्ग जिल्हांना 'येलो' अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईत पुढील दोन ते तीन तासांत पावसाचा जोर आणखीच वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
 
हवामान खात्याने मुसळाधार पावसाच्या शक्यतेचा इशारा दिल्याने नागरिकांनी सतर्क राहावे, तसेच स्थानिक यंत्रणेकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे पुढील काही तास महत्वाचे असणार आहेत.

मराठवाड्यासह विदर्भात धो-धो बरसणार
नाशिकमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू असून गोदावरी नदीला मोठा पूर आला आहे. अनेक मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दुसरीकडे मराठवाड्यासह विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पाऊस कोसळणार, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.

 
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group