गणपती विसर्जनाच्या दिवशी राज्यातील अनेक भागात चांगला पाऊस झाला. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार राज्याच्या काही भागात चांगला पाऊस पडत आहे, तर काही भागात अद्यापही चांगल्या पावसाची गरज आहे. आजही राज्याच्या विविध भागात जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. कुठं पावसाचा ऑरेंज अलर्ट तर कुठं यलो अलर्ट देण्यात आला आहे.
हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आज राज्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. आज राज्यातील मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
आज रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातही पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबईसह ठाणे, पालघर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, अहमदनगर, उस्मानाबाद आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
तर विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आणि अमरावती या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. या पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहनं करण्यात आलं आहे.
दरम्यान भंडारा जिल्ह्यात गेल्या दहा दिवसांपासून गायब असलेला पाऊस अखेर आज बरसला आहे. सकाळपासून ढगाळ वातावरण असताना दुपारच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. दहा दिवसांपूर्वी चांगला पाऊस झाला होता. त्यानंतर पावसानं उसंत घेतली होती. त्यामुळं वातावरणात प्रचंड उकाडा निर्माण झाला होता. या जोरदार पावसानं आता गारवा निर्माण झाला असून, जड वाणाच्या भात पीकाला याचा फायदा होणार आहे.
तळकोकणात जोरदार पाऊस
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज आणि उद्या यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. जिल्ह्यात विजांच्या गडगडाटासह आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे. या कालावधीत नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन प्रशासनानं केलं आहे. सध्या जिल्ह्यात 65 ते 115 मी.मी. सोसाट्याचा वारा वाहत आहे. जिल्ह्यात सर्वच भागात पावसाने जोर धरला आहे. समुद्रातील खराब हवामानामुळं आज सिंधुदुर्ग किल्यावर केली जाणारी प्रवासी वाहतूक सेवा तसेच समुद्रातील साहसी जलक्रीडा बंद ठेवण्याचे आदेश महाराष्ट्र सागरी मंडळाचे दिले आहेत. तर मच्छीमारांना खोल समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये असं आवाहन केले आहे.