रतन टाटा यांचा राज्याकडून सन्मान! महाराष्ट्राचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार प्रदान
रतन टाटा यांचा राज्याकडून सन्मान! महाराष्ट्राचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार प्रदान
img
Dipali Ghadwaje

प्रसिद्ध उद्योगपती, टाटा समूहाचे प्रमुख रतन टाटा यांचा आज महाराष्ट्राचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार  देऊन गौरव करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन हा पुरस्कार दिला. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत या पुरस्कारची घोषणा केली होती.

महाराष्ट्र भुषण पुरस्काराच्या धरतीवर या वर्षीपासून ‘उद्योगरत्न पुरस्कार’ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्यानुसार हा पुरस्कार देण्यात आला. उद्योगपती रतन टाटा यांना महाराष्ट्र सरकारच्या वतीने पहिला 'उद्योगरत्न' पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील उद्योगक्षेत्रात भरीव काम केल्याबद्दल शाससानं रतन टाटा यांचा गौरव केला.

दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या हस्ते रतन टाटांना उद्योगरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. यावेळी रतन टाटा यांच्या मुंबईतील कुलाबा येथील निवासस्थानी हा छोटेखानी सोहळा पार पडला. 


पुरस्काराचे स्वरुप 

25 लाख रुपयांचा धनादेश, सन्मानचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप होते. टाटा यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी रतन टाटा यांच्याशी उद्योग आणि राज्यातील विकास प्रकल्पांविषयी चर्चा केली.


महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या नामवंत उद्योजकांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्काराच्या धर्तीवर या वर्षीपासून राज्य शासनाने 'महाराष्ट्र उद्योग पुरस्कार' देऊन त्यांना सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्योग सचिव हर्षदीप कांबळे या वेळी उपस्थित होते.


टाटा म्हणजे विश्वास अशी जगभर ख्याती असलेल्या उद्योग समूहाचे रतन टाटा यांना हा पुरस्कार देण्याने पुरस्काराचा सन्मान वाढला आहे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी पुरस्कार प्रदान केल्यानंतर माध्यमांशी बोलताना म्हणाले,


टाटा समुहाने देशासह, जगभरात उद्योग क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे, असे देखील ते या वेळी म्हणाले. उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे यांनी यावेळी टाटा यांना देण्यात आलेल्या सन्मानपत्राचे वाचन केले.

इतर बातम्या
Join Whatsapp Group