राज्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता असून, हवामान विभागाने अनेक जिल्ह्यांना यलो अलर्टचा इशारा दिला आहे. उन्हाच्या तीव्रतेने नागरिकांची दैना उडाली असून, घराबाहेर पडताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
विदर्भात उष्णतेचा प्रकोप अधिक जाणवत असून, चंद्रपूरमध्ये तब्बल ४५.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले आहे. अकोला, अमरावती, नागपूर आणि ब्रह्मपुरी याठिकाणीही तापमान ४५ अंशांच्या आसपास पोहोचले आहे. यामुळे या भागांमध्ये उष्णतेची लाट जाणवणार असून नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.
हवामान खात्याने कोकणातील ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसह, मराठवाड्यातील बीड, परभणी, हिंगोली, धाराशिव, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांत उष्ण व दमट हवामानाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे या भागांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यासोबतच सोलापूर शहरातही उष्णतेचा प्रकोप अधिक असून, तापमान ४३ अंशांवर पोहोचले आहे.
राज्यातील अनेक शहरांमध्ये तापमान ४० अंशांपेक्षा अधिक असून, उन्हाचा तडाखा वाढतच चालला आहे. नागरिकांनी भर दुपारी घराबाहेर जाणे टाळावे, पाणी भरपूर प्यावे आणि उष्णतेपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.