यावर्षी पावसाने मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह सामान्य माणसांचीही तारांबळ उडाली आहे. याचदरम्यान आता मान्सून बद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. दरम्यान, हवामान विभागाने यावर्षीच्या मान्सूनसंदर्भात दिलेल्या प्राथमिक अंदाजानुसार यंदा पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा 104 टक्क्यांनी अधिक राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. सध्या राज्यात मागील दोन आठवड्यांपासून प्री-मान्सून पावसाने हजेरी लावली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा या विभागांमध्ये चांगल्या स्वरूपाचा पाऊस झाला आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील पाच दिवसांत कोकण, दक्षिण महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कोल्हापूरसह अनेक भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतीसाठी आवश्यक असलेल्या मशागतीची कामे पूर्ण करावीत. मात्र, हा पाऊस पूर्वमौसमी असल्यामुळे शेतकऱ्यांनी याचा वापर फक्त मशागत आणि तयारीसाठीच करावा, असा सल्ला हवामान विभागाने दिला आहे.
मान्सूनची प्रगतीही समाधानकारक असून पुढील चार ते पाच दिवसांत केरळमध्ये मान्सून दाखल होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पावसासाठीची हवामान स्थिती देखील अनुकूल होत असल्याचे हवामानशास्त्रज्ञांनी सांगितले आहे. सामान्यतः जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मान्सून महाराष्ट्रात प्रवेश करेल, अशी शक्यता यंदाही वर्तवली जात आहे.
खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची आता तयारी सुरू केली आहे. मात्र, हवामान खात्याचे स्पष्ट निर्देश आहेत की, जोपर्यंत अधिकृतपणे मान्सूनच्या महाराष्ट्रातील आगमनाची घोषणा होत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणीच्या कामांना सुरुवात करू नये. कारण अतिआधी पेरणी केल्यास पिकाचे नुकसान होऊ शकते. योग्य वेळेची वाट पाहून नियोजन केल्यास उत्पादनात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सध्याच्या हवामान स्थितीचा विचार करता, राज्यातील अनेक भागांत शेतीपूरक वातावरण तयार होत आहे. मात्र खरीप हंगामात यशस्वी पेरणीसाठी अधिकृत मान्सूनची वाट पाहणे गरजेचे आहे. हवामान विभागाकडून वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचना आणि अंदाज लक्षात घेऊन शेतीची कामे करावीत, असा सल्ला पुण्यातील कृषी हवामानशास्त्रज्ञ जालिंदर साबळे यांनी दिला आहे.