वणी येथून एक हृदयद्रावक अशी घटना समोर आली आहे. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एका मातेला प्रसूतीदरम्यान आपल्या बाळासह स्वतःच जीव गमवावा लागला आहे. ही घटना वणी येथील सर्वोदय हॉस्पिटलमध्ये घडली आहे. या प्रकरणात मिळालेल्या तक्रारीवरून डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 3 जून 2024 रोजी सकाळी पौर्णिमा ऊर्फ रूपाली धर्मेंद्र जाधव (रा. हरणटेकडी, ता. सुरगाणा) यांना वणी येथील डॉ. अमितकुमार बोथरा यांच्या सर्वोदय हॉस्पिटलमध्ये प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले होते. प्रसूतीदरम्यान पौर्णिमा व बाळाचा मृत्यू झाला. सदर हॉस्पिटलमध्ये पुरेशी सुविधा नव्हती, तसेच प्रसूतीपूर्वी व्यवस्थित तपासण्या केल्या नाहीत. पोटातील बाळ आडवे आहे की नाही याची खात्री न करता व पुरेशी व्यवस्था नसतानाही प्रसूती करण्याचा प्रयत्न केल्याने माता व पोटातील बाळाचा मृत्यू झाला असल्याची तक्रार मृत महिलेचे सासरे मोहन सजन जाधव यांनी केली आहे.
तसेच, या प्रकरणी पाच-सहा दिवस तक्रार नोंदवण्यास टाळाटाळ झाली असल्याची माहिती आहे. त्यानंतर फिर्याद झीरोमध्ये दाखल करून प्रकरण सुरगाणा पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले होते. दरम्यान, या प्रकरणी अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.