नाशिक - आज सायंकाळी झालेल्या पावसामुळे निफाडमध्ये वीज पडून एकाचा मृत्यू झाला तर नाशिक तालुक्यात जातेगाव येथे वीज पडल्याने मुलगा जखमी झाला आहे. सप्तशृंगी गडावरुन येणाऱ्या गाडीवर दगड पडल्यामुळे गाडीचे नुकसान झाले आहे तर वीज पडल्यामुळे दोन हजार कोंबड्यांचाही मृत्यू झाला आहे.
नाशिक जिल्ह्यामध्ये सतत बेमोसमी पाऊस सुरूच आहे. आज सायंकाळी देखील जिल्ह्यामध्ये सुमारे एक तास पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे वडगाव पंगु याठिकाणी पोल्ट्री फार्मवर वीज पडल्यामुळे दोन हजार कोंबड्या मयत झाल्या आहेत.

निफाड तालुक्यातील मौजे सुखाने येथे शेतामध्ये काम करुन परत येणाऱ्या शेतकरी दीपक रंगनाथ राहणे (वय 40) याच्या अंगावर वीज पडल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे. दिपक राहणे यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. नाशिक जिल्ह्यातील जातेगाव या ठिकाणी देखील वीज कोसळल्यामुळे आदित्य राजाराम वळवे हा बारा वर्षीय मुलगा जखमी झाला असून त्याला तातडीने नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सतत सुरू असलेल्या पावसामुळे सप्तशृंगी गडावरून दर्शन घेऊन परत येणाऱ्या भाविकाच्या गाडीवर अचानक दगड कोसळल्यामुळे गाडीचे मोठे नुकसान झाले असून कोणतीही जीवित हानी झाली नसल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, नाशिकमध्ये अजून तीन दिवस बेमोसमी पाऊस हजेरी लावणार असल्याचा अंदाज वेधशाळेच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.