आजकाल च्या तरुणाई मध्ये ऑनलाईन गेम खेळणे हा एक फॅड झाला असून याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. या ऑनलाईन गेमिंग मार्फत झटपट पैसे कमवणे अन श्रीमंत होणे असा फंडा या मुलांचा असतो. पण यासोबतच याचे गंभीर तोटे देखील होऊ शकतात याची प्रचिती एका घटनेतून यतेय. नागपूरमध्ये असंच एक प्रकरण समोर आलं आहे. ऑनलाइन गेम खेळण्याच्या नादात कर्जबाजारी झाालेल्या एक तरुणाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूर शहरातील कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. संबंधित तरूणाला ऑनलाईन गेम खेळण्याचे व्यसन लागलं होतं. यातूनच त्याने आत्महत्या केली. अनिकेत ढबाले (वय २५) असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. अनिकेत हा कामठी शहरातील एका प्रतिष्ठित बेकरीमध्ये काम करायचा.
दरम्यान, अनिकेतला ऑनलाइन मोबाईल गेम खेळण्याचे व्यसन लागलं होतं. ऑनलाइन गेमसाठी तो दररोज पैसे खर्च करत होता. त्याला या गेमचं इतकं वेड लागलं होतं की तो दिवसभर मोबाइलमध्ये अडकलेला राहायचा. पगार संपल्यानंतर तो लोकांकडून उधार पैसे घेऊन गेम खेळत होता. या गेममुळे तो कर्जात बुडल्याने मानसिक तणावात होता. दरम्यान, त्याने राहत्या घरी विषारी उंदीर मारण्याचं औषध प्राशन करून आत्महत्या केली. घरातील सदस्यांना तो बेशुद्ध अवस्थेत रुममध्ये आढळला. त्याला तातडीने नजिकच्या एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पंरतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह शवविच्छेदनासाठी कामठी येथील सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी आत्महत्येची नोंद केली. या घटनेने परिसरात खळबळ माजली.