राज्यातील खाजगी रुग्णालयांमध्ये रुग्णांकडून अवाजवी मोठ्या प्रमाणात शुल्क आकारले जाते. हाच मुद्दा विधानसभेतही उपस्थित करण्यात आला. विधानसभेत या संदर्भात काँग्रेस नेते नाना पटोले यांनी प्रश्न उपस्थित करत महात्मा फुले जनआरोग्य योजना आणि पंतप्रधान जनआरोग्य योजना यांचा एकत्रित लाभ रुग्णांना मिळण्यासाठी सरकार काय उपाययोजना करणार, असा सवाल केला. तसेच या योजनांअंतर्गत उपचार मिळत असतानाही काही रुग्णालयांकडून रुग्णांकडून अतिरिक्त पैसे घेतले जात असल्याच्या अनेक तक्रारी असल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.
यावर उत्तर देताना आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले की, रुग्णालयांवर आम्ही कारवाई करतोय. जिल्हा पालकमंत्री, लोकप्रतिनिधी आणि आमदार यांच्या समावेशाने एक समिती स्थापन करण्यात आली असून ती दर तीन महिन्यांनी आढावा घेते. कुठेही गैरप्रकार आढळल्यास सरकार कारवाई करण्यास मागेपुढे पाहणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पुढे आरोग्यमंत्री आबिटकर म्हणाले की, या योजनेत एक पैसा घेतला तर तात्काळ कारवाई आम्ही करतोय. रुग्णालयांना पॅकेजेस वाढवून देण्यात आली आहे. एक चूक झाली तरी आम्ही कारवाई करणार आहोत. आमदारांनी आपल्या मतदारसंघातही योजनेचा आढावा घ्यावा. जर चूक असेल तर तात्काळ आम्ही कारवाई करणार, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.