बर्फ थेट चेहऱ्याला लावताय? सावधान! होऊ शकतो 'फ्रॉस्टबाइट'; जाणून घ्या आईस फेशियल करण्याची योग्य वेळ आणि पद्धत
बर्फ थेट चेहऱ्याला लावताय? सावधान! होऊ शकतो 'फ्रॉस्टबाइट'; जाणून घ्या आईस फेशियल करण्याची योग्य वेळ आणि पद्धत
img
नितीशा कुलकर्णी










फेसबुक, इन्स्टाग्राम सारख्या सोशल मीडियावर अनेकदा आईस मसाजचे व्हिडिओ पाहायला मिळतात. बर्फाच्या पाण्यात चेहरा बुडवतानाचे व्हिडिओ हमखास पाहायला मिळतात. थंड पाण्यामुळे चेहऱ्यावरची सूज कमी होण्यासाठी, त्वचा घट्ट होण्यासाठी आणि नैसर्गिक चमक टिकून राहण्यासाठी मदत होते.

यामुळे चेहऱ्यातील रक्तवाहिन्या आकुंचित करून रक्ताभिसरण सुधारतं. उन्हाळ्यात थंड पाण्यानं किंवा बर्फानं चेहरा धुणं हा एक सोपा घरगुती उपाय आहे. थंड पाण्यानं चेहरा धुतल्यानं त्वचेचं तापमान कमी होतं आणि फ्रेश वाटतं. उन्हाळ्यात त्वचेतून जास्त घाम आणि तेल बाहेर पडतं, ज्यामुळे चिकटपणा आणि मुरुम येऊ शकतात.

थंड पाण्यामुळे या ग्रंथी तात्पुरत्या शांत होतात आणि अतिरिक्त तेल नियंत्रित करण्यासाठी मदत होते. थंड पाण्यामुळे चिकटपणा कमी येतो.

उन्हाळ्यात आजारपणं का वाढतात ?
वैज्ञानिक दृष्टिकोनातून, रक्तवाहिन्या आकुंचन पावल्यामुळे थंड पाण्याचा त्वचेवर अधिक परिणाम होतो. थंड पाण्याच्या संपर्कात आल्यावर, त्वचेतील रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, ज्यामुळे सूज, लालसरपणा आणि जळजळ कमी होते. रक्तवाहिन्यांमधील स्नायूंच्या आकुंचनामुळे त्यांचा व्यास कमी होतो, यालाच व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन म्हणतात. ही प्रक्रिया रक्तप्रवाह कमी करून शरीराचं तापमान नियंत्रित करते.

ही शरीरातील एक नैसर्गिक आणि महत्त्वाची प्रक्रिया आहे. उष्णतेमुळे येणारं पुरळ, सनबर्न, त्वचेची उघडी छिद्र आणि त्वचा तेलकट होणं यासारख्या उन्हाळ्यातील समस्या थंड पाणी किंवा बर्फ वापरल्यानं बऱ्याच अंशी कमी होऊ शकतात.

डोळ्यांखालील सूज किंवा चेहऱ्याचा थकवा कमी करण्यासाठी बर्फ प्रभावी ठरतो. पण हे करताना काही गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. खबरदारी - थेट त्वचेवर बर्फ लावल्यानं फ्रॉस्टबाइट होऊ शकतो, म्हणून लावण्यापूर्वी तो नेहमी मऊ कापडात किंवा आईस रोलरमध्ये गुंडाळा.

दिवसातून दोन ते तीन वेळा थंड पाण्यानं चेहरा धुणं पुरेसं आहे. जास्त धुण्यामुळे त्वचेतील नैसर्गिक ओलाव्याचं संतुलन बिघडू शकतं. थंड पाण्याचा वापर फक्त एक ते दोन मिनिटांसाठीच करावा. ज्यांची त्वचा खूप संवेदनशील आहे किंवा ज्यांना रोझेशियाचा त्रास आहे, त्यांनी बर्फाचा वापर अत्यंत सावधगिरीनं करावा.
इतर बातम्या
Join Whatsapp Group