उन्हाळ्यात चेहरा निस्तेज झालाय? 'दही-काकडी'चा हा फेस पॅक देईल नैसर्गिक थंडावा आणि जबरदस्त चमक!
उन्हाळ्यात चेहरा निस्तेज झालाय? 'दही-काकडी'चा हा फेस पॅक देईल नैसर्गिक थंडावा आणि जबरदस्त चमक!
img
नितीशा कुलकर्णी








एप्रिल महिना संपून आता मे महिना जवळ येतोय तस तसा उन्हाचा कडाका चांगलाच वाढलायला लागला आहे. उन्हाळ्यात, तीव्र ऊन, घाम आणि धुळीमुळे आपली त्वचा निस्तेज आणि चिकट होऊ शकते.

उन्हाळ्यात निस्तेज झालेला चेहरा थंड आणि ताजातवाना करण्यासाठी विविध सौंदर्य उत्पादनं वापरतात, पण यामुळे अनेकदा त्वचेचं अधिक नुकसान होतं. उन्हाळ्यात ताक, दही, काकडीचा आहारात समावेश केला असेल तर दही आणि काकडीपासून बनवलेला फेस पॅकही वापरुन पाहा.

या सोप्या घरगुती उपायानं त्वचेला थंडावा मिळतो आणि त्वचेवर चमकही येते. दह्यामधे लॅक्टिक ॲसिड असतं, यामुळे त्वचा हळुवारपणे एक्सफोलिएट करून स्वच्छ होते. काकडी नैसर्गिक शीतल घटक आहे, ज्यामुळे त्वचेला आराम मिळतो आणि सूज किंवा लालसरपणा कमी होतो. दही, काकडी मिळून त्वचेला आर्द्रता देतात आणि उष्णतेच्या परिणामांपासून तिचं संरक्षण करण्यास मदत करतात. हा फेस पॅक बनवायला खूप सोपा आहे.

अर्धी काकडी किसून घ्या. त्यात दोन चमचे ताजं दही घाला. एकजीव होईपर्यंत व्यवस्थित मिसळा. सुगंध आणि थंडावा वाढवण्यासाठी, इच्छा असेल तर त्यात एक चमचा गुलाबजल देखील घालू शकता. सर्वप्रथम, चेहऱ्यावरील घाण आणि तेल काढून टाकण्यासाठी चेहरा स्वच्छ पाण्यानं धुवा. तयार केलेली पेस्ट चेहऱ्यावर आणि मानेवर हळुवारपणे लावा.

पंधरा ते वीस मिनिटं सुकू द्या. त्यानंतर, थंड पाण्यानं स्वच्छ धुवा. हा पॅक आठवड्यातून दोन ते तीन वेळा वापरल्यानं चांगले परिणाम मिळू शकतात. हा फेस पॅक विशेषतः तेलकट आणि संवेदनशील त्वचा असलेल्यांसाठी फायदेशीर आहे. यामुळे त्वचेला आराम मिळतो आणि अतिरिक्त तेल नियंत्रित करण्यास मदत करतो.

ज्यांना उन्हामुळे त्वचा जळण्याचा किंवा काळवंडण्याचा त्रास होतो, त्यांच्यासाठीही हा एक सोपा घरगुती उपाय ठरू शकतो. त्वचा खूप संवेदनशील असेल तर आधी पॅच टेस्ट करा. फेस पॅक चेहऱ्यावर जास्त वेळ लावून ठेवणं टाळा. त्वचेला त्याचे पूर्ण फायदे मिळावेत यासाठी नेहमी ताजं दही आणि काकडीचा वापर करा.

न्हाळ्यात नैसर्गिक स्किनकेअरसाठी, दही-काकडी फेस पॅक हा एक सोपा, स्वस्त आणि प्रभावी पर्याय आहे. नियमित वापरामुळे त्वचा ताजीतवानी दिसेल.


इतर बातम्या
Join Whatsapp Group