राज्यातील घडामोडींना वेग आला असून सध्या विविध परीक्षांविषयी अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात येत आहे. आता अशीच एक मोठी अपडेट समोर आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) राज्यातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय लाखो उमेदवारांना मोठा दिलासा देणारा ठरला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार , महाराष्ट्र गट-क सेवा परीक्षेअंतर्गत ‘लिपिक-टंकलेखक’ आणि ‘कर सहाय्यक’ पदांसाठी आयोगाकडून स्वतंत्रपणे घेतली जाणारी टंकलेखन कौशल्य चाचणी पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे. आयोगाच्या २४ एप्रिल २०२६ रोजी झालेल्या २०५ व्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून, २० मे २०२६ रोजी यासंदर्भातील अधिकृत परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.
आयोगाच्या या निर्णयामुळे राज्यातील हजारो स्पर्धा परीक्षा उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. यापूर्वी मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवारांना स्वतंत्र टंकलेखन कौशल्य चाचणी द्यावी लागत होती. आता ही प्रक्रिया पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे.
नव्या नियमानुसार, उमेदवारांना आता केवळ पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा द्यावी लागणार आहे. मुख्य परीक्षेनंतर आयोगाकडून कोणतीही स्वतंत्र टंकलेखन चाचणी घेतली जाणार नाही. अंतिम गुणवत्ता यादी आणि शिफारस यादी मुख्य परीक्षेतील गुणांच्या आधारे तयार केली जाणार आहे.