महागाईचा दणका ! आता केस कटिंग, दाढीही महागणार..
महागाईचा दणका ! आता केस कटिंग, दाढीही महागणार..
img
Nandini khandare More


जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर देशात महागाई वाढली असून आता ग्राहकांसाठी आणखी एक दणका  देणारी बातमी समोर आली आहे. सामोर आलेल्या माहितीनुसार ,  सलूनमध्ये जाऊन दाढी करणं, केस कापणं हेही आता महाग होणार आहे. सलूनसेवेचे दर 20 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय महाराष्ट्र नाभिक महामंडळाने घेतला असून त्यामुळे आता ग्राहकांना सलून सेवांसाठी आता अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचा खिसा चांगलाच हलका होणार आहे.

सलून व्यावसायिकांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील सलून सेवांच्या दरांमध्ये 20 टक्क्यांची वाढ होणार असल्याची माहिती आहे. ही दरवाढ आजपासून लागू होणार असून ग्राहकांना उद्यापासून नवीन दरानुसार पैसे भरावे लागणार आहेत. त्यामुळे केस कापण्यासाठी जर 100 रुपये दर असतील तर त्याजागी आता 120 रुपये तर दाढीसाठी 80 च्या जागी 100 रुपये मोजावे लागतील.

युद्धामुळे झालेल्या इंधन दरवाढीचा फटका सलून व्यवसायालाही बसला आहे. सलून व्यवसायासाठी आवश्यक असलेल्या कॉस्मेटिक वस्तू, इंधन, वीजबिल, दुकानांचे भाडे तसेच कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये झालेली वाढ यामुळे सलून चालकांवर आर्थिक ताण वाढला आहे. याच पार्श्वभूमीवर सर्व सलून सेवांच्या दरांमध्ये 20 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वाढती महागाई, सलूनमध्ये वापरल्या जाणाऱ्या साहित्याच्या वाढलेल्या किंमती, वीजबिल, दुकानभाडे आणि कर्जावरील वाढते हप्ते यामुळे व्यवसाय चालवणे कठीण झाल्याचे महामंडळाने म्हटले आहे. त्यामुळे दरवाढीचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आलं.

ग्रामीण आणि शहरी भागातील नवीन दर आजपासून, म्हणजे 6 जून 2026 पासून लागू करण्यात आले आहेत. ही दरवाढ नफा वाढवण्यासाठी नसून सलून व्यावसायिक आणि त्यांच्या कुटुंबांचे आर्थिक अस्तित्व टिकवण्यासाठी आवश्यक असल्याचे महामंडळाचे राज्याध्यक्ष सयाजी झुंजार यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, ग्राहकांनीही या निर्णयाकडे केवळ दरवाढ म्हणून न पाहता हजारो नाभिक कुटुंबांच्या जगण्याशी संबंधित प्रश्न म्हणून पाहावे आणि सहकार्य करावे, असं आवाहन महाराष्ट्र नाभिक महामंडळाने केलं आहे.

प्रीमियम, एसी, साधे तसेच ग्रामीण भागातील सलूनसाठी स्वतंत्र दरपत्रक जाहीर करण्यात येणार आहे. सध्या प्रीमियम सलूनमध्ये दाढीसाठी 200 ते 500 रुपये, एसी सलूनमध्ये 100 ते 200 रुपये, साध्या सलूनमध्ये 50 ते 80 रुपये तर ग्रामीण भागातील सलूनमध्ये 50 ते 70 रुपये आकारले जातात. तसेच केस कापण्यासाठी प्रीमियम सलूनमध्ये 500 ते 1000 रुपये, एसी सलूनमध्ये 150 ते 350 रुपये, साध्या सलूनमध्ये सुमारे 150 रुपये आणि ग्रामीण भागात 80 ते 100 रुपये शुल्क आकारले जाते.

दरम्यान, ग्राहकांकडून या दरवाढीबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत असून, वाढलेल्या दरांचा आर्थिक भार सर्वसामान्यांना परवडणारा नसल्याचे मत व्यक्त केले जात आहे. सलून सेवांचे दर स्थिर ठेवावेत, अशी मागणीही ग्राहकांकडून करण्यात आली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group