येत्या काही दिवसांवर दहावी आणि बारावीची विद्यार्थ्यांची परीक्षा आहे. त्या अनुषंगाने शिक्षण विभागाकडून तयारी सुरु आहे. याच दरम्यान मंत्री नितेश राणे यांनी शिक्षणमंत्र्यांना पत्र लिहिले आहे.
मुस्लिम परीक्षार्थी विद्यार्थिनींना बुरखा घालून परीक्षा केंद्रात प्रवेश देऊ नका, अशी मागणी करणारे पत्र मस्त्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणेंनी शिक्षणमंत्री दादा भुसेंना लिहिले आहे.
नितेश राणे म्हणाले, देशामध्ये राहताना इतर धर्मीय विद्यार्थ्यांना जो नियमम लागतो नियम मुस्लिम विद्यार्थ्यांना देखील पाळला पाहिजे. बुरखा घालून परीक्षेला बसाल तर त्याचे अनेक धोके आहे. संबधित खात्याने या संदर्भात लवकर लवकर निर्णय घ्यावा. राज्यात हिंदुत्ववादी विचाराचे सरकार आहे. आता लाड करण्याची गरज नाही. नितेश राणे पुढे म्हणाले, हा निर्णय 2024 सालचा आहे. परीक्षेसोबतच मतदानाच्या वेळीही असे प्रकार उघडकीस आलेले आहेत. नेमकी तीच विद्यार्थी परीक्षेला आहेत का हे देखील पाहावं लागेल. इतर विद्यार्थ्यांप्रमाणे या मुलांनीही आपला धर्म शाळेत आणू नये.
इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेस परीक्षार्थीना बुरखा घालून परीक्षा देण्यास परवानगी, तसेच परीक्षेच्या वेळी आवश्यकता वाटल्यास प्रकरणपरत्वे तपासणीसाठी महिला पोलीस /अधिकारी किंवा शिक्षक कर्मचारी, यांची नेमणूक करण्यात यावी, असे शासन स्तरावरुन कळविण्यात आले आहे.
इयत्ता दहावी व बारावी परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या परीक्षा आहे. यावर विद्यार्थ्यांचे संपूर्ण भविष्य अवलंबून आहे. सदर परीक्षा पारदर्शकपणे कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार जसे कॉपी मुक्त परीक्षा होणे अपेक्षित आहे. याकरीता शासनस्तरावरुन वेळोवेळी सुचना दिल्या जातात. जर, परीक्षार्थींना बुरखा घालून परीक्षा केंद्रावर प्रवेश देण्यात आला तर, एखादी परीक्षार्थी बुरखा घालून इलेक्ट्रॉनीक उपकराणाचा उपयोग करुन परीक्षा देत आहे की नाही, हे तपासणे शक्य होत नाही. आकस्मिक प्रसंगी काही आक्षेप उद्भवल्यास सामाजिक तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन अनेक विद्यार्थ्यांना नुकसान सहन करावे लागेल.
राज्यातील इयत्ता दहावी व इयत्ता बारावीच्या परीक्षार्थीना बुरखा घालून परीक्षा केंद्रात प्रवेश नाकारण्याकरीता तातडीने कार्यवाही करण्याच्या अनुषंगाने आपल्या स्तरावरुन सर्व संबंधितांना योग्य ते आदेश द्यावेत, ही विनंती.