सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाने बीड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून या प्रकरणानंतर बीड मधील गुन्हेगारीच्याअनेक घटना उघडकी आल्या. दरम्यान, बीड जिल्ह्याचे पालकमंत्रिपद उपमुख्यमंत्री अजित पवारांनी हाती घेतले आहे. याच पार्श्वभूमीवर नुकतीच बीड जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली.
या बैठकीत पालकमंत्री अजित पवार, पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, मंत्री धनंजय मुंडे यांसह जिल्हा नियोजन समितीचे सदस्य उपस्थित होते. या बैठकीदरम्यान धनंजय मुंडे यांनी गेल्या चार वर्षातील पालकमंत्री कार्यकाळातील कामकाजाचा लेखाजोखा मांडला. यावेळी त्यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना भयमुक्त वातावरण करण्याबद्दल तात्काळ ठोस उपाययोजना कराव्यात, असे मत व्यक्त केले.
धनंजय मुंडे यांनी एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी बीड जिल्ह्याबद्दल काही प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच त्यांनी बीड जिल्ह्याची बदनामी थांबावा, यासाठी काही ठोस उपाययोजना कराव्या अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली.
बीड जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून जातीयवादाचे विष काही लोकांकडून जाणीवपूर्वक पेरले जात आहे. याचा परिणाम जनतेपासून ते अगदी प्रशासनावर सुध्दा झालेला दिसून येत आहे. जिल्हा प्रशासनात सुध्दा उभी फूट पडली आहे, हे नाकारता येणार नाही. कोण कधी कुठल्या अधिकाऱ्याचे नाव आणि जात काढून काय आरोप करतील ते सांगता येत नाही, त्यामुळे शिपाई ते जिल्हाधिकारी सर्वच अधिकारी – कर्मचारी यांच्यावरती भीती व दडपणाचे वातावरण आहे.
अशा परिस्थितीत आपल्या पदांना व कामांना हे अधिकारी कसा न्याय देऊ शकतील? त्यामुळे अधिकारी कर्मचारी यांची एक विशिष्ट रणनीती ठरवून त्यांना भयमुक्त वातावरण तयार करून देण्याबाबत तात्काळ ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. तसेच काही अफवा पसरवून, अर्धवट माहितीच्या आधारे मीडिया ट्रायल चालवून बीड जिल्ह्याची नको ती प्रतिमा बाहेर प्रसिद्ध केली जात आहे. सबंध जिल्ह्याची नाहक बदनामी होत आहे. सामाजिक सलोखा अबाधित रहावा तसेच जिल्ह्याची बदनामी थांबावी, याबाबतही ठोस उपाययोजना करण्याची मागणी धनंजय मुंडे यांनी अजित पवारांकडे केली आहे.
बीड जिल्हा नियोजन समितीची बैठक नवनिर्वाचित पालकमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली.