‘बिग बॉस मराठी’ मधील यंदाचा सिझन गाजला तो स्पर्धकांमुळे, त्यांच्यातील बॉन्डमुळे. ‘बिग बॉस’ संपल्यानंतरही हे स्पर्धक एकमेकांच्या संपर्कात असतात. ‘बिग बॉस’मधील हे स्पर्धक एकमेकांच्या भेटी घेताना दिसतात. नुकतंच ‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता वालवलकर हिने ‘बिग बॉस मराठी’चा विजेता सूरज चव्हाण याच्या बारामतीतील मोढवे गावातील घरी जात त्याची भेट घेतली. त्यानंतर अंकिताने सूरज आणि त्याच्या कुटुंबियांच्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. पण इन्स्टाग्रामवर या भेटीचे फोटो शेअर करण्यात आल्यानंतर अंकिता आणि सूरज यांच्यात वाद निर्माण झाला आहे.
बिग बॉसच्या घरात असताना सूरज आणि अंकिता हे दोघे एकमेकांसोबत पाहायला मिळाले. अंकिता सूरजला तिचा भाऊ मानत होती. या दोघांनी हे बहीण भावाचं नातं बिग बॉसच्या संपल्यानंतरही या दोघांनी हे नातं जपलं. सूरजच्या वाढदिवसाला अंकिताने व्हीडिओ कॉल केला होता. त्याचा व्हीडिओ तिने इन्स्टाग्राम स्टोरीला शेअर केला होता. पण तेव्हाही अनेकदा फोन करून देखील त्याच्या आजूबाजूचे लोक सूरजशी बोलणं होऊ देत नाहीत, अशी तक्रार अंकिताने सूरजकडे केली होती.
अंकिता वालावलकर तिचा होणारा पती संगीतकार कुणाल भगतसोबत बारामतीतील सूरज चव्हाणच्या घरी गेली. तिथे जात अंकिता सूरज आणि त्याच्या कुटुंबियांना भेटली. तेव्हा साधेपणाने चव्हाण कुटुबियांनी अंकिताचं स्वागत केलं. या भेटीचे फोटो अंकिताने इन्स्टाग्रामवर शेअर केले. यावेळी तिने सूरज चव्हाणसोबत इन्स्ट्राग्राम कोलॅब्रेशन केलं. तेव्हा सूरजने ते अॅक्सेप्ट केलं. पण नंतर मात्र अंकिताची पोस्ट सूरजच्या अकाऊंटवर दिसणं बंद झालं. ही गोष्ट अंकिताच्या चाहत्यांनी तिच्या लक्षात आणून दिली.
काय म्हणाली अंकिता?
12 तासांच्या आत अंकिताची पोस्ट सूरजच्या अकाऊंटवरून रिमुव्ह करण्यात आलीय, अशी कमेंट अंकिताच्या पोस्टवर तिच्या चाहत्याने केली. यावर अंकितानेही प्रतिक्रिया दिली आहे. थँक यू, तुम्ही ही गोष्ट लक्षात आणून दिली. पण एक शेवटचं सांगते सूरज त्याचं इन्स्टाग्राम अकाऊंट हँडल करत नाही. सूरजच्या आजूबाजूला त्यांना मी नको असल्या कारणास्तव मी ह्यातून काढता पाय घेत आहे. यापुढे माझ्याकडून अपेक्षा नसाव्यात, धन्यवाद, असं अंकिता म्हणाली आहे. त्यामुळे बिग बॉसच्या घरात असताना चांगले मित्र असणारे अंकिता आणि सूरज यांच्यामध्ये वाद निर्माण झाला आहे.