बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणावरून संपूर्ण राजकारण ढवळून निघाले असून या घटनेनंतर अनेक प्रकरणे समोर आले आहेत. दरम्यान, ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांनी भटक्या विमुक्त समाजातील आदिवासी मागास समाजातील गुंड्या गायकवाड यांच्या हत्येबद्दल प्रश्न उपस्थितीत केले आहेत. यावेळी गुणरत्न सदावर्ते यांनी आमदार सुरेश धस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
“हा देश संविधानावर चालतो. कोणाची जात उच्च आणि नीच आहे, अशी कोणतीही तरतूद या संविधानामध्ये नाही. आरोपी हा आरोपी आहे, मग तो कोणीही असो कोणत्याही जाती धर्माचा असो आरोपी हा आरोपी असतो. भटक्या विमुक्त समाजातील आदिवासी मागास समाजातील गुंड्या गायकवाड साहेब यांचा जो खून झाला, हे प्रकरण बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणापेक्षा देखील गंभीर आहे. कशाप्रकारे हत्यारे तयार करण्यात आली ते धस यांचे शेत होतं का?” असा सवाल गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे.
“सुरेश धस यांच्या पत्नीने तीन लाख रुपये पाठवले होते, ती रक्कम जप्त होते. केंद्र हे तपासातील अधिकारी ते मेन विटनेस आहेत. ते डंके की चोट पे सांगत आहेत धस यांना आज देशमुख प्रकरणावर बोलण्यासाठी तोंड राहिलेले नाही. धस कोण आहेत हे मराठा समाजाचे आहेत. उच्च जातीचे आहेत. ते तत्कालीन मंत्री होते हे काहीही मायने राखत नाही. त्यांच्या कुटुंबाचे इन्व्हॉलमेंट गुंड्या गायकवाड मर्डर केसमध्ये असेल तर बाबतीत पूर्णपणे छडा लागला पाहिजे”, अशी मागणी गुणरत्न सदावर्ते यांनी केली.
“पोलीस अधिकारी केंद्रे यांचे स्टेटमेंट रेकॉर्ड करून पुन्हा तपास पुढे घेऊन गेले पाहिजे. सुरेश धस यांच्या पत्नीने आरोपीला तीन लाख रुपये केसमधून काढता पाय घेण्यासाठी दिली असेल, हत्यारे धसांच्या शेतातून जप्त केले असतील, आरोपीला पकडण्यापासून मज्जाव केला असेल तर त्यांचे इन्वॉलमेंट आहे”, असाही गंभीर आरोप गुणरत्न सदावर्ते यांनी केला.
तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की , “जितेंद्र आव्हाड यांना परत सांगतो, तुम्ही घसा कोरडा करून ओरडत होता तर या बाबतीमध्ये तर तुम्हाला आता बोललच पाहिजे. ठाण्यात येऊन ठणकावून डंके की चोट पे सांगतो अगोदर जितेंद्र आव्हाड साहेबांनी गुंड्या गायकवाड साहेब जे मागासवर्गीय होते यांची हत्या झाली त्यांच्यावर बोलायचं. अगोदर झालेले खून काय खून नव्हते का? त्यातून काय रक्त निघत नव्हतं का? त्या रक्ताला काय किंमत नव्हती?” असा सवालही गुणरत्न सदावर्ते यांनी केला.
“सुरेश धस हे लोकशाही मधून आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. ते तत्कालीन मंत्री होते. त्यांनी मंत्री पदाचा गैरवापर केला होता. म्हणून सभापती महोदयांनी चौकशी करावी. मी पोलीस महासंचालकांना विनंती करतो. आम्ही न्यायालयामध्ये जाण्याच्या अगोदर सुरेश धस आणि त्यांची पत्नीबद्दल तातडीने पावले उचलावीत. धसांना अटक करावी”, अशी मागणीही गुणरत्न सदावर्ते यांनी केली.