पती आणि पत्नीच्या वादविवादातून अनेक गंभीर गुन्हे घडत असल्याच्या अनेक घटना उघडकीस येत आहेत. एक डॉक्टर पटीने आपल्या पत्नीची हत्या केली असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील दरोडा प्रकरणाला धक्कादायक कलाटणी मिळाली आहे. मोताळा तालुक्यातील दाभाडी गावात काही दिवसांपूर्वी रात्री दरोडा टाकून पती आणि पत्नीला मारहाण केल्याची घटना घडली होती, यामध्ये गजानन टेकाळे यांच्या पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. मात्र या प्रकरणाला आता धक्कादायक वळण लागलं आहे.
डॉक्टरच्या पत्नीची हत्या झाल्याच्या बुलढाण्याच्या घटनेत अनैतिक संबंधासाठी पतीने पत्नीचा काटा काढल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. आरोपी पतीने पत्नीला ठार करून दरोड्याचा बनाव केला होता, पण पोलिसांनी मोठ्या शिताफीने या प्रकरणाचा छडा लावला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी डॉ. गजानन टेकाळे याला पोलिसांनी अटक केली आहे.
पशूवैद्यकीय डॉक्टर असलेल्या गजानन टेकाळे यानेच अनैतिक संबंधास अडसर ठरत असलेल्या आपल्या पत्नीला ठार करून दरोड्याचा बनाव केल्याचं उघड झालं आहे. या संपूर्ण प्रकरणाने जिल्ह्याभरात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी गजानन टेकाळे याने पत्नी माधुरीला ऍसिडिटीचे औषध सांगून मोठ्या प्रमाणात झोपेच्या गोळ्यांचे चूर्ण करून प्यायला दिले. एवढच नाही तर त्याने उशीने तोंड दाबून तिचा जीव घेतला. कुणालाही संशय येऊ नये म्हणून गजानन टेकाळे याने घरातील कपाट अस्ताव्यस्त केलं, तसंच तो स्वत:ही झोपेच्या गोळ्या घेऊन बेशुद्ध झाला होता.
मृत्यू झालेल्या माधुरी टेकाळे यांचे शरीर निळसर पडले असल्याने तसंच आरोपीच्या मोबाईलमध्ये आढळलेल्या आक्षेपार्ह फोटोमुळे आरोपीला पोलिसी खाक्या दाखवला असता आरोपी गजानन टेकाळे याने आपला गुन्हा कबूल केला आहे.