घाटामध्ये दरीत कार कोसळून अपघात झाला असल्याची धक्कादायक बातमी समोर आली असून या अपघातात आई आणि मुलाचा मृत्यू झाला. पण या घटनेचा शोध लागायला दोन दिवस लागले. ज्या ठिकाणी ही कार कोसळली होती, त्याबद्दल कुणालाच माहित नव्हते. अखेरीस मोबाईल लोकेशनच्या आधारे शोध घ्यावा लागला, तेव्हा मायलेकाचे मृतदेह सापडले. रत्नागिरी जिल्ह्यातील कुंभार्ली येथे ही मन सुन्न करणारी घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी जिल्ह्यात कुंभार्ली घाटात दोन दिवसांपूर्वी भीषण अपघात झाला होता. या अपघातात विश्वजित जगदीश खेडेकर (वय 42) तर सुरेखा जगदीश खेडेकर ( वय 65) यांचा मृत्यू झाला. विश्वजित खेडेकर हे आपल्या आईसोबत स्विफ्ट डिझायर कारने पुण्याहून कुंभार्ली येथील गावी येत होते. पण कुंभार्ली घाटात पोहोचले असता गाडी खोल दरीत कोसळून अपघात झाला. कार दरीत कोसळली, यात दोघांना जबर मार लागला आणि यातच त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान , खेडेकर कुटुंबीय विश्वजीत आणि सुरेखा खेडेकर यांची वाट पाहत होते. पण दिवस उलटला तरी दोघेही घरी आले नाही. त्यांचा शोध सुरू केला. विश्वजीत यांच्या पत्नी मोबाईलवर फोन केला तर कुणी उचलत नव्हतं. शेवटी दोन दिवसांनंतर त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. शिरगाव पोलीस स्टेशनमध्ये रितसर तक्रार दाखल केली. पोलिसांनी मोबाईल लोकेशनवरून शोध घेण्यास सुरुवात केली, तेव्हा कुंभार्ली घाटातलं ठिकाण समजलं. घटनास्थळी जाऊन जेव्हा पाहणी केला असता खेडेकर यांची कार दरीत कोसळली होती. अपघाताला दोन दिवस उलटले होते. या अपघातात दोघांचाही मृत्यू झाला होता.
दरम्यान, अग्निशमन दल आणि स्थानिक लोकांच्या मदतीने दरीत उतरून मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्यांचे पार्थिव शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. खेडेकर यांच्या कारचा अपघात कसा झाला, याबद्दल अद्याप माहिती मिळू शकली नाही. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहे.